मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका घोटाळा
By admin | Published: May 22, 2016 04:16 AM2016-05-22T04:16:37+5:302016-05-22T04:16:37+5:30
देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये गणना होणाऱ्या मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिका घोटाळा उघडकीस आला आहे. न सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी परीक्षा विभागाच्या
मुंबई : देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये गणना होणाऱ्या मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिका घोटाळा उघडकीस आला आहे. न सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी परीक्षा विभागाच्या ताब्यातील उत्तरपत्रिका पुन्हा विद्यार्थ्यांना घरी दिल्या जात होत्या व त्यासाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी १५ ते २० हजार रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणला. या प्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील तिघा क्लार्कसह आठ जणांना अटक करण्यात आली असून अनेक वर्षांपासून हे रॅकेट सुरू असल्याचे समजते. यात विद्यापीठातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. यामध्ये अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेनंतर काही कर्मचारी विद्यार्थ्यांना त्याच रात्री या उत्तरपत्रिका पुन्हा देत होते. विद्यार्थी घरी जाऊन राहिलेले प्रश्न सोडवून दुसऱ्या दिवशी पुन्हा या उत्तरपत्रिका कर्मचाऱ्यांकडे जमा करत होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून सरासरी १५ ते २० हजार रुपये घेतले जात होते. या प्रकरणी विद्यापीठातील लिपिक सिद्धेश जाधव (वय २६), रोहन मोरे (२५), संदीप जाधव (२८), शिपाई मिथुन मोरे (२८), चिमण सोलंकी (४१), संजय कुंभार (४२), दिनकर म्हात्रे (३४) आणि सुरक्षारक्षक प्रभाकर वझे (५०) यांना अटक करून त्यांच्याकडून गणित विषयाच्या तब्बल ९२ उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत, असे परिमंडळ-सहाचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी काही जण विद्यापीठातून उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना घरी देत असल्याबाबत बोलत असल्याचे भांडुप पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमेश यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब वरिष्ठांना सांगितली. भांडुप परिसरातील मनोज शिंगाडे या विद्यार्थ्याने काही उत्तरपत्रिका घरी सोडवण्यासाठी आणल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडे ३० पाने असलेली एक उत्तरपत्रिका आढळली. त्याची चौकशी केली असता, यामागील रॅकेट उघडकीस आले.
सुरक्षा रक्षकाला सर्वाधिक वाटा
विद्यार्थ्यांकडून एका पेपरसाठी हे आरोपी १५ ते २० हजार रुपये घेत होते. त्यातील आठ हजार रुपये हे केवळ ज्या ठिकाणी पेपर ठेवले जातात, तेथील सुरक्षा रक्षक प्रभाकर वझे याला मिळत होते. तो हे पेपर बाहेर काढून इतर सहकाऱ्यांना देत होता. तसेच पेपर लिहून परत आणल्यानंतर हे पेपर पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्याचे देखील काम त्याचेच होते. त्यामुळे त्याचा वाटा मोठा होता. त्यानंतर राहिलेली रक्कम इतर वाटून घेत.
पोलीस अहवालानंतर कारवाई
पेपर रॅकेटप्रकरणी पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर तातडीने परीक्षा मंडळाची बैठक बोलाविली जाईल. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर रितसर कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वेसावे यांनी सांगितले.