वनखात्याच्या मुरुमाची जेसीबीने चोरी
By admin | Published: June 9, 2017 02:59 AM2017-06-09T02:59:36+5:302017-06-09T02:59:36+5:30
सफाळे येथील वनविभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या सरु पाडा येथील नैसर्गिक नाल्यातून मुरुम व मातीचे अवैधरित्या उत्खनन केले गेले आहे
शुभदा सासवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सफाळा : सफाळे येथील वनविभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या सरु पाडा येथील नैसर्गिक नाल्यातून मुरुम व मातीचे अवैधरित्या उत्खनन केले गेले आहे. या उत्खननात हजारो ब्रास मुरुम व मातीची चोरी झाल्यामुळे तेथील नाल्याचा व पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला गेला आहे.
यामध्ये तेथील स्थानिक पुढाऱ्यासह अधिकाऱ्याचाही हात असल्यामुळे हे गौण खनिजाचे अवैध उत्खनन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मंगेश घरत यांनी या उत्खनना बाबतीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वन अधिकारी देसले यांनी ही जमीन वाटप केली असून वनविभागात येत नाही असे सांगून हात वर केले. तसेच याबाबतची तक्र ार महसूल विभागाकडे करावी असे सांगितले. हा नाला खाजगी नाही. याची माहिती नसल्याचा देखावा सध्या वन विभाग व त्याचे स्थानिक अधिकारी करीत आहेत.
>गाळ काढायची परवानगी दिली, मुरुमाची नाही
तहसीलदारांशी या बाबतीत संपर्क साधला असता त्यांनी घरत यांना महसूल विभागाकडून या नाल्याजवळ असलेल्या धरणाचा गाळ काढण्याची परवानगी दिल्याचे सांगितले . मात्र या नाल्यातील मुरूम व माती उत्खननाची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. आपण या उत्खननाच्या ठिकाणी भेट देऊन त्यात दोषी असलेल्या विरोधात कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार महेश साबळे यांनी दिले.नालेसफाईच्या नावाखाली मुरुम व मातीची चोरी करून तब्बल १२ फूट खोल, ४० फूट रुंद व ४०० मीटर लांब रस्ताच तयार केला. या प्रकारामुळे अनेक वृक्षांची मुळे उघडी पडली आहेत.