डीजेच्या तालावर तरुणाई सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 03:06 AM2016-08-26T03:06:55+5:302016-08-26T03:06:55+5:30
कर्णकर्कश डीजेच्या तालावर सैराट झालेली तरुणाई वेगवेगळ्या राजकीय पक्ष व मंडळांनी आयोजित केलेल्या दहीहंड्यांमध्ये थिरकताना दिसली.
डोंबिवली : कर्णकर्कश डीजेच्या तालावर सैराट झालेली तरुणाई वेगवेगळ्या राजकीय पक्ष व मंडळांनी आयोजित केलेल्या दहीहंड्यांमध्ये थिरकताना दिसली. रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यत अलीकडेच राज्यमंत्रीपदाची माळ पडल्याने त्यांच्या दहीहंडीचा नूर यंदा न्यारा होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी बहुतांश आयोजकांनी घेतली.
सकाळच्या सत्रात फारसा उत्साह दिसून आला नसला, तरीही संध्याकाळी मात्र रंगत चढत गेली. चव्हाण यांच्या बाजीप्रभू चौकातील हंडीला मात्र सकाळपासूनच बघ्यांसह ठिकठिकाणच्या पथकांनी हजेरी लावत सलामी दिली. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, नेते तात्या माने यांची तर राजाजी पथ येथे पक्षाचे उपशहरप्रमुख विवेक खामकर, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांची हंडी शिव मंदिर रोड येथे होती. पश्चिमेलाही कोपर रोड, दीनदयाळ रोड येथे नगरसेवक शैलेश धात्रक यांनी हंडीचे आयोजन केले होते.
चिठ्ठ्या टाकून निवड
भाजपाने आपल्या दहीहंडीत २ लाख ३४ हजार ५६७ रुपयांच्या प्रथम पारितोषिकासह सलामी देणाऱ्या सर्वांनाच ५ हजारांचे पारितोषिक दिले. गेल्या पाच वर्षांत ज्या पथकांनी हंडी फोडली होती, त्या सर्व पथकांना बोलवण्यात आले होते. चिठ्ठ्या टाकून हंडी फोडण्याचा मान दिला. सातत्याने केवळ चार थर लावणाऱ्यांनाच संधी दिली. चौधरी यांची गजबंधन सोसायटी परिसरातील हंडी म्हात्रेनगर येथील वॉरियर्स गोविंदा पथकाने फोडली. त्यांना २१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले. अन्य २५ सलामी पथकांना प्रत्येकी दोन हजारांचे पारितोषिक देण्यात आले. विवेक खामकर यांच्या राजाजी पथ मार्गावरील हंडी फोडण्याचा मान आयरे रोड येथील साई गोविंदा पथकाला मिळाला. आयोजकांनी ७७ हजार ७७७ एवढ्या रुपयांची बक्षिसे वाटली.
>गोविंदा पथकांची वाहने घरडा सर्कल येथे थांबवून आवश्यक तेवढ्याच गाड्या शहरात येऊ दिल्याने किरकोळ अपवाद वगळता वाहतूककोंडी झाली नाही.
स्टेशन परिसरात दिवसभर कर्णकर्कश भोंग्यांचा त्रास रहिवाशांना जाणवला.
पुरुष गोविंदा पथकांच्या तुलनेत महिला पथकांची संख्या मात्र फारशी नव्हती. युवा राष्ट्र महिला मंडळ व ओमसाई महिला मंडळ आदींचे पथक मात्र ठिकठिकाणी हजेरी लावत होते. अनेक ठिकाणी त्यांनी ५ व ६ थर लावले.
शहरातील बहुतांश हंड्या संध्याकाळी ७ च्या सुमारास, तर चव्हाण यांची हंडी मात्र रात्री पावणेदहाच्या सुमारास फुटली. हंड्या फोडून झाल्यानंतर बहुतांशी पथकांनी बाजीप्रभू चौकात येत उत्सवाच्या समारोपाचा जल्लोष केला.
महिलांनी आॅलिम्पिकमध्ये वर्चस्व मिळवत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील मानाची हंडी फोडण्याचा मान महिलांनाच मिळाला आहे. महाराष्ट्रातील असा निर्णय सर्वप्रथम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला. ही हंडी अष्टविनायक महिला मंडळाने फोडली.