दौंडला विशेष सभेत गदारोळ

By Admin | Published: July 23, 2016 01:43 AM2016-07-23T01:43:51+5:302016-07-23T01:43:51+5:30

दौंड नगर परिषदेच्या विशेष सभेत आरक्षण क्रमांक ५१च्या मुद्द्यावरून अभूतपूर्व असा गदारोळ झाला.

Junkoal in the Special Assembly | दौंडला विशेष सभेत गदारोळ

दौंडला विशेष सभेत गदारोळ

googlenewsNext


दौंड : दौंड नगर परिषदेच्या विशेष सभेत आरक्षण क्रमांक ५१च्या मुद्द्यावरून अभूतपूर्व असा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोन नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या टेबलवर अक्षरश: डोके आपटून घेतले. टेबलवर हात मारणे, एकमेकांच्या अंगावर धाऊन जाणे यामुळे एकूणच सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, सभेतून सत्ताधाऱ्यांनी पळ काढला, असा आरोप नगर परिषदेतील विरोधी गटनेते बादशाह शेख यांनी केला, तर विशेष सभा पूर्ण होऊन विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याचे प्रभारी नगराध्यक्षा आकांक्षा काळे यांनी स्पष्ट केले.
गोपाळवाडी रोडवरील मंडईसाठी आरक्षणाची जागा संपादित करायची हा विषय आला. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, दौंडच्या विस्तारीत भागात मंडई असणे गरजेचे आहे. या विषयाला सर्वानुमते मंजुरी मिळाली.
आरक्षण क्रमांक ५१मधील १५ हजार चौरस मीटर जागेवर नगर परिषदेचे आरक्षण आहे. परंतु सदरची जागा मूळ मालकाला हायस्कूलसाठी विकसित करण्यासाठी द्यायची आहे, जमीनमालकाच्या अर्जावर चर्चा करून निर्णय घेण्याचा विषय पुढे आल्यानंतर विरोधी गटनेते बादशाह शेख म्हणाले, या जागेच्या मूळ मालकाने ठरावाला विरोध न करण्याच्या बदल्यात, मला आॅफर केली. तुमच्या निवडणुकीचा सर्व खर्च मी करेन.’ असे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी खर्च करायला निघालेल्या जागामालकांनी मग सत्ताधाऱ्यांसाठी काय तरतूद केली असेल? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. जमीनमालकाने निवडणूक खर्च करण्याचे आमिष दाखवले. मग शेख यांनी पोलिसांकडे तक्रार का दिली नाही, असा प्रश्न कटारिया यांनी उपस्थित केला. हा विषय मंजूर करू नका, असे शेख यांनी सांगताच, हा विषय मंजूर करा, असा सूर सत्ताधारी नगरसेवकांनी लावला.
अखेर शेख यांनी नगराध्यक्षा आकांक्षा काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्या टेबलाजवळ जाऊन डोके आपटून घेतले. तर सत्ताधारी नगरसेवक प्रमोद देशमुख यांनीही विषय मंजुर करा असे म्हणत डोके टेबलावर आपटून घेतले. ठराव मंजूर केला तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेख यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रभारी नगराध्यक्षा आकांक्षा काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, नगरसेवक गुरमुख नारंग, जब्बार शेख, नंदू पवार, अनिल साळवे, राजू बारवकर यांनी चर्चेत भाग घेतला. (वार्ताहर)
दौंड येथील आरक्षण क्रमांक ५१ या जमिनीतील मूळ मालक अंबादास पवार यांनी सदरच्या आरक्षित जागेत शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, तसा सकारात्मक ठराव व्हावा अशी मागणी नगर परिषदेकडे केली आहे. परंतु १७ मे २0१३ रोजी नगर परिषदेने पवार यांना अतिक्रमण केल्याबाबत नोटीस पाठवली. तीस दिवसांच्या आत अतिक्रमण न काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कळवले. तेव्हापासून नगर परिषदेने मूळ मालकाला पाठविलेल्या नोटिशीचा काय पाठपुरावा केला याचा उलगडा अद्याप झाला नाही. एकीकडे अतिक्रमण केले म्हणून जागामालकाला नोटीस पाठवायची, दुसरीकडे त्यांच्याच आलेल्या पत्रावर चर्चा करायची. नगर परिषदेच्या या दुटप्पी धोरणाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे़

Web Title: Junkoal in the Special Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.