जुन्नर, आंबेगावला वादळी वाऱ्याचा तडाखा
By Admin | Published: May 3, 2017 01:44 AM2017-05-03T01:44:02+5:302017-05-03T01:44:02+5:30
जुन्नर तालुक्याला रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. घोंघावणाऱ्या जोरदार वादळाने
जुन्नर : जुन्नर तालुक्याला रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. घोंघावणाऱ्या जोरदार वादळाने जुन्नर शहरातील तसेच सोमतवाडी, कबाडवाडी, विठ्ठलवाडी, खानापूर परिसरातील घरांचे पत्रे उडाले. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले. सर्वाधिक फटका फळबागांना बसला. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या आंब्याची वाऱ्यामुळे मोठी झड झाली. कांदापिकाला बाजारभाव नसल्याने मेटाकुटीला आलेला शेतकरी किमान आंब्याचे चांगले पैसे हाती येतील, या अपेक्षेत असतानाच आंबा उत्पादक शेतकरी यामुळे हवालदिल झाला आहे.
जुन्नर-कबडवाडी, जुन्नर-ओतूर, जुन्नर-नारायणगाव, जुन्नर-आपटाळे रस्त्याच्याकडेची तसेच काही ठिकाणी शेतातील वड, लिंब, बाभुळ आदी झाडे पूर्णपणे उन्मळून पडली. रस्त्यावर झाडे पडल्याने काही ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्तादेखील बंद राहिला. अनेक ठिकाणी उडालेले पत्रे व विजेचे खांब, तसेच वीजवाहक तारांवर पडले. काही ठिकाणी झाडेदेखील विजेच्या खांबावर पडल्याने खांब वाकल्याने तारा तुटल्या. परिणामी रविवारी संध्याकाळी ७ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी संध्याकाळी काही अंशी सुरळीत झाला. वाऱ्यामुळे प्रामुख्याने शेतघरे, पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान केले. वाऱ्याच्या माऱ्याने घराचे पत्रे थरथरून आवाज यायला लागल्याने नागरिकांनी घर सोडून जीव वाचविण्यासाठी बाहेर धूम ठोकली. त्यानंतर थोड्याच वेळात पत्र्याच्या खाली असलेल्या वजनदार लोखंडी सांगाड्यासह पत्रे वाऱ्याने उडवून दिले. सिमेंटच्या पत्र्याचे तुकडे झाले, तर लोखंडी पत्रे पिळले गेले. जुन्नर शहरालगत असलेल्या कृष्णराव मुंढे विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या १२ फूट रुंद व ४० फूट लांबीच्या पत्र्याच्या छताची एक बाजू पूर्णपणे लोखंडी सांगाड्यासह उचलली जाऊन वाऱ्याच्या वेगाने लोणार आळीकडे जाणारा जुन्नर बॉइज होमच्या संरक्षक कुंपणालगत असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन कोसळले. परिणामी लोखंडी खांब अर्ध्यात वाकला जाऊन वीजवाहक तारा तुटल्या. जुन्नर शहरातील कल्याण पेठ, बेळे आळी, ब्राम्हण बुधवार पेठ, तसेच इतरत्र ठिकाणी पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. जुन्नर-माणिकडोह रस्त्यावरील वडाची झाडे वाऱ्यामुळे कोसळली. कबाडवाडी येथील सुनील आवटी यांचे शेतातील राहत्या घराच्या पुढील बाजूचे पत्र्याचे छत, तसेच पत्र्याची शेड वादळाने उचकटून काही अंतरावर फेकून दिले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील कातकरी समाजाच्या वस्तीवरील शांताराम वाघ, लक्ष्मण वाघ, रोहिदास वाघ यांच्या घराचे सिमेंटचे पत्रे उडाले. घरातील कपडे उडून गेले. भांडी विखुरली गेली, तसेच वस्तीतील इतर घराचेदेखील थोडे-फार नुकसान झाले. काही घरांच्या भिंतीदेखील हलू लागल्या आहेत. परिणामी अगोदरच हलाखीचे जीवन जगणाऱ्या या कातकरीवर घरदुरुस्तीचे आर्थिक संकट कोसळले. नुकसानग्रस्त घरात प्रामुख्याने पत्र्याचे छत असणारीच घरे आहेत. जोरदार वादळ झाल्यानंतर पाऊस मात्र आला नाही; अन्यथा छत उडालेल्या घरातील वस्तूंचे नुकसान वाढले असते. (वार्ताहर)
उत्पादनावर होणार परिणाम
जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात जुन्या तसेच नवीन लागवड झालेल्या आंब्याच्या बागा आहेत. शेती व्यवसायाबरोबरच आंबा उत्पादनावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक बेगमी अवलंबून असते. मोठ्या प्रमाणात तोडणीसाठी आलेले आंबे गळून गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच व्यापारीवर्गालादेखील याचा फटका बसला. कारण आंबा तोडणीयोग्य होण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देऊन माल राखून ठेवतात.
आंब्याच्या बागेत कच्च्या कैऱ्यांचा सडा पडला असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या उन्हाळी बाजरीच्या पिकांना वादळाचा फटका बसला. शेतात उभी असलेली बाजरी खाली आडवी झाली. याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या रोपांचे, तसेच मल्चिंग पेपरचेदेखील नुकसान झालेले आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक, आइस्क्रीम विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांना अडचणींना सामोरे जावे लागले.
ओझर परिसरात घरांचे पत्रे उडाले
ओझर आणि परिसरातील गावे तसेच तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधे ठिकठिकाणी सोमवारी वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांची छपरे उडाली. या वादळाचा सर्वाधिक फटका पिकांना बसला.
येनेरे परिसरात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातीतोंडी आलेले आंबे हवेच्या वेगाने गळून पडले. यामुळे झाडाखाली कच्च्या आंब्यांचा खच पडला होता. महसूल व कृषी विभागाने तालुक्यात आंबा उत्पादक असणाऱ्या निरगुडे, काले गावातील नुकसानीचा पंचनामा केला आहे. ओझर परिसरातील धालेवाडी, शिरोली बुद्रुक, खुर्द, तेजेवाडी, हापूसबाग, आगर या गावंतील शेतकऱ्यांच्या घरांच्या, कांदा बराखी, गार्इंचे गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास दोन तास वेगाने वारा वाहत होता. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही घरांचे पत्रे शंभर फूट अंतरावर फेकले गेले. तालुक्यात ज्या ठिकाणी या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
अवसरीत रिक्षावर झाड पडले
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे बाभळीचे झाड तीनचाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे गाडीवर पडले. अॅपे गाडीचे मालक व तीन प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून वाचले. ही घटना रविवारी रात्री वादळी वाऱ्यात घडली.
अवसरी खुर्द येथील टेमकर वस्तीजवळ बाभळीचे झाड रस्त्यावर पडले. त्या वेळी तेथून जाणारी अॅपे झाडाच्या खाली सापडली. या घटनेत चालकासह ३ प्रवासी बालंबाल बचावले. झाड मोठे असल्याने २ जेसीबीच्या सहायाने ते रस्त्याच्या बाजूला काढण्यात आले. यामुळे २ तास कोंडी झाली. अॅपे गाडीचे अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संजय हिंगे यांनी दिली. झाड काढण्यासाठी आनंदराव शिंदे यांनी दोन जेसीबी मोफत दिले. तसेच श्यामराव टेमकर, स्वप्निल टेमकर, अवधूत शिंंदे यांनी सहकार्य केले.