जीवनविद्या मिशनचा गुरुपौर्णिमा सोहळा
By admin | Published: July 15, 2017 03:05 AM2017-07-15T03:05:11+5:302017-07-15T03:05:11+5:30
वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३ ते ९ जुलैदरम्यान कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठाच्या पुण्यस्थळी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीवनविद्या मिशनच्या वतीने सद्गुरू वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३ ते ९ जुलैदरम्यान कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठाच्या पुण्यस्थळी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला. दर दिवशी राज्यातील विविध ठिकाणांहून तीन ते चार हजार नामधारक ज्ञानपीठात येत होते. त्यांची व्यवस्था करण्यासाठी जीवनविद्या मिशनचे युवा नामधारक १५ दिवस अगोदरपासूनच सज्ज झाले होते. संपूर्ण नियोजन शिस्तबद्धरीतीने करण्यात आले. यासाठी सुरक्षा, स्वच्छता, किचन, पार्किंग, आयटी/टेक्निकल, सभागृह व्यवस्था अशा विविध समिती कार्यरत होत्या. सभामंडपात विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्याद्वारे नामधारकांना अवयवदान अभियान, वृक्षारोपण अभियान, ग्राम समृद्धी अभियान याची माहिती देण्यात येत होती.
‘करावी पूजा मनेची उत्तम... लौकिकाचे तिथे काय काम’ या संत उक्तीवर आधारित वामनराव पै यांनी मानसपूजेची निर्मिती केली. अशी मानसपूजा ज्येष्ठ नामधारक सर्व नामधारकांकडून करून घेत होते.
या वेळी शिवाजीराव पालव, शीतल गोरे, संतोष तोत्रे, वंदना बेल्हे, भरत पिंगळे, नामदेव मिरगुले, शंकर बांदकर यांनी मार्गदर्शन केले. प्रल्हाद पै यांनी मानवी संस्कृतीचे संस्कार-समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता याविषयी ७ दिवस मार्गदर्शन केले.
>प्रथम पारितोषिक
जीवनविद्या ज्ञानपीठाला वास्तुरचनेसाठी आणि पर्यावरणाला अनुकूल अशा सुंदर लँडस्केपिंगसाठी ‘दिल्ली आर्किटेक्चर फेस्टिव्हल २०१६’चे प्रथम पारितोषिक मिळाले. हे प्रशंसापत्रक देण्यासाठी वास्तुविद्याविशारद रोहित सिंकरे उपस्थित होते. त्यांनी हे प्रशंसापत्रक प्रल्हाद दादांना सुपुर्द केले.
>सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी...
सुख, समाधान आणि शांती या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. त्यासाठी जीवनविद्या मिशनचे समाज उपयुक्त काम प्रेमाने केले पाहिजे. दृष्टी समतेची, कृती सभ्यतेची, वागणूक सामंजस्याची, वृत्ती सहिष्णुतेची, बैठक समाधानाची आणि युक्ती कृतज्ञतेची यालाच युक्तियोग म्हणतात. सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. मानवी संस्कृतीचे हे सहा संस्कार आत्मसात करून तुम्ही तुमचे जीवन सुखी आणि आनंदी करू शकता.
- प्रल्हाद वामनराव पै
अवयवदान
जीवनविद्या मिशनचे सचिव विवेक बावकर यांनी अवयवदान अभियानात, आतापर्यंत ३ हजार अवयवदात्यांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. अवयवदानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष दिलीप पटवर्धन यांनी अवयवदान म्हणजे जीवनदान या विषयावर मार्गदर्शन केले.
वृक्षारोपण
दोन लाख वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प जीवनविद्या मिशनने केला आहे. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आणि इतर विश्वस्त यांनी कृतज्ञता दिनानिमित्ताने वृक्षारोपण करून लोकांसमोर आदर्श घालून दिला.
६० गावे दत्तक
महाराष्ट्र सरकारच्या ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती चळवळीमध्येही मिशनचा सहभाग जाहीर करण्यात आला. जीवन विद्या मिशनच्या हीरक महोत्सवी वर्षांतर्गत ६० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वोतोपरी विकास करण्याचा निर्णय ग्राम समृद्धी अभियानांतर्गत घेतला होता. त्यांच्या विकासासाठी मिशनने जे योजनाबद्ध नियोजन केले आहे त्याचा तपशील देण्यात आला.
बेटी बचाओ बेटी पढाओ
सद्गुरूंनी स्त्रीला नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात जीवनविद्या मिशनचा सहभाग आहे, असे या वेळी सांगण्यात आले.