कोल्हापुरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसली; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 09:35 PM2017-10-01T21:35:00+5:302017-10-01T21:39:38+5:30
सहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झाला
कोल्हापूर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस (कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन भाविक ठार झाले; तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने केएमटी बसची तोडफोड करून ती पेटविली, तर अग्निशामकच्या दोन गाड्यांचीही मोडतोड केली. संतप्त जमावाला रोखणे पोलिसांना अवघड झाल्याने जलद कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. बसचा ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
तानाजी भाऊ साठे (वय ५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये अमर रामा कवाळे, स्वप्निल सुनील साठे, सचिन दत्ता साठे, आकाश तानाजी साठे, संदीप तानाजी साठे, साहील घाटगे (सर्व रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांचा समावेश आहेत.
रविवारी सायंकाळी ताबूत, पंजे विसर्जन मिरवणूक पारंपरिक थाटात सुरू होती. पापाची तिकटी, गंगावेशमार्गे हे पंजे पंचगंगा नदीकडे प्रयाण करीत होते. याचवेळी विसर्जन मिरवणुकीमुळे या मार्गावर प्रचंड गर्दी होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पापाची तिकटीहून घसरतीला केएमटी बस जात असताना ती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत घुसली. यामुळे परिसरात हाहाकार उडाला. या दुर्घटनेत दोन भाविक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींंना नागरिकांनी तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. संतप्त जमावाने केएमटी बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवून बसची तोडफोड केली. त्यानंतर काही वेळात ही बस पेटवून दिली. प्राथमिक तपासात केएमटी बसचा ब्रेक निकामी झाल्याची माहिती आहे.
जमाव इतका प्रक्षुब्ध झाला की, त्यांनी त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; पण जमावाचा संताप वाढत चालला होता. पेटविलेली केएमटी बस विझविण्यासाठी घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांवरही जमावाने हल्ला चढवून या गाड्यांचीही मोडतोड केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते.