आचारसंहिताभंगाची कारवाई नावापुरतीच
By admin | Published: January 18, 2017 01:24 AM2017-01-18T01:24:00+5:302017-01-18T01:24:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आचारसंहिता लागू झाल्या असताना पुणे शहरात काही विकासकामांची उद्घाटने केली
पुणे : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी आचारसंहिता लागू झाल्या असताना पुणे शहरात काही विकासकामांची उद्घाटने केली, काही नेत्यांनी आचारसंहितेचा भंग करून सरकारी इमारतीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, आचारसंहितेमध्ये कोणतीही परवानगी न घेता नेत्याच्या वाढदिवसांचे जाहीर कार्यक्रम घेणे... आचारसंहिताभंगाच्या यासारख्या अनेक गंभीर तक्रारी असतानादेखील एकाही प्रकरणामध्ये प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग असो की राज्य निवडणूक आयोग कोणत्याही स्वरुपाच्या निवडणुका जाहीर केल्यावर त्या-त्या भागात आचारसंहिता लागू करते व अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले जातात. परंतु फ्लॅक्स, बॅनर काढून या कारवाईची मोठी आकाडेवारी देण्यापुरतीच निवडणूक प्रशासनाची कारवाई राहते. निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात परस्परविरोधी आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी दाखल होतात. या तक्रारी नंतर काही प्रकरणांमध्ये पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केले जातातदेखील, मात्र अंतिम स्वरुपात कोणत्याही ठोस कारवाई होत असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
>विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात २०९ प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंग करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ २३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु निवडणूक झाल्यानंतर या तक्रारीचेदेखील पुढे काहीच झाले नाही. लोकसभा निवडणुकीतदेखील सुमारे १२० आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. पण या तक्रारीमध्येदेखील पुढे काहीच झाले नाही. यामुळे निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून केवळ आचारसंहितेचा नावापुरताच कांगावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.