Narayan Rane : ‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’, नारायण राणेंचा राज्य सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:27 AM2021-10-24T06:27:41+5:302021-10-24T06:27:52+5:30
Narayan Rane ; अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सादरीकरण सुरू केले असता राणेंनी त्यांना रोखले. आपण उत्तम मराठी बोलू शकता. आपण मराठीतच बोला, असे त्यांनी बजावले. राणे यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
मुंबई : नुसते मंत्रालय, मंत्रालय म्हणू नका. नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे, तेथे काही घडतच नाही, असा टोला केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी हाणला.
भाजपच्या वतीने मंत्री-कार्यकर्ता संवादअंतर्गत केंद्रीय मंत्र्यांशी संवादाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत भाजपच्या उद्योग/व्यापारी आघाडीच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी राणे यांच्या संवादाचे आयोजन मंत्रालयाजवळील भाजपच्या प्रदेश कार्यालयात करण्यात आले होते.
राणेंकडे असलेल्या खात्यात कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होतील, याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. या विभागातील अधिकारी ही माहिती उपस्थितांना सादरीकरणाद्वारे सांगत होते. मात्र याच दरम्यान अधिकारी वारंवार लघू, सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय, मंत्रालय असा उल्लेख करीत होते. यावेळी अधिकाऱ्यांना थांबवत राणे म्हणाले की, कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा; नाही तर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील, ज्याचे दुकान सध्या बंद आहे.
अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सादरीकरण सुरू केले असता राणेंनी त्यांना रोखले. आपण उत्तम मराठी बोलू शकता. आपण मराठीतच बोला, असे त्यांनी बजावले. राणे यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.