'नुकतीच शपथ घेतलीय, खिसे गरम व्हायचेत अजून'; मंत्री यशोमती ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:37 PM2020-01-05T17:37:51+5:302020-01-05T17:46:53+5:30
राज्य़ात सध्या जिल्हा परिषद स्तरावरील निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे नव्याने नियुक्त झालेले मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत.
मुंबई : राज्य़ात सध्या जिल्हा परिषद स्तरावरील निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे नव्याने नियुक्त झालेले मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत. शनिवारी काँग्रेसच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंजालाच मतदान करण्याचे आवाहन करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे य़ांनी घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका असे वक्तव्य केले होते. आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनीही त्यांचीच री ओढली आहे. यामुळ नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हाध्यक्षांनी मला ताई काही जमले नाही बरं का, अशी तक्रार केली. यावर ठाकूर यांनी आताच शपथ घेतली आहे, खिसे गरम व्हायचेत अजून, असा सबुरीचा सल्ला दिला. आपले काही सरकार नव्हते. सध्या विरोधात आहेत त्यांचे खिसे बंबाटच भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करायचे असतील तर तुम्ही घरी आलेल्या लक्ष्मीला नको म्हणू नका, घरी आलेल्या लक्ष्मीला का नको म्हणायचे, पण मत पंजालाच करायचे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.