हा तर फक्त ‘टे्रलर’, पाऊस बाकी आहे
By admin | Published: June 13, 2016 02:29 AM2016-06-13T02:29:55+5:302016-06-13T02:29:55+5:30
मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली.
मुंबई : मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होताच, महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले होते. प्रत्यक्षात मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला पश्चिम व अंधेरी पूर्व येथे तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने रहिवाशांना त्रास झाल्याने वॉचडॉग फाउंडेशनने महापालिकेवर सडकून टीका करत, हा तर फक्त ‘टे्रलर’ असल्याचे म्हटले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात थोडासा मुसळधार पाऊस पडला, तरी ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना काही नव्या नाहीत. मात्र, यंदा मान्सूनपूर्व कामांची जय्यत तयारी करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचणार नाही; असा दावा महापालिकेने केला आहे.
शनिवारी सकाळी जेव्हा पावसाने सुरुवात केली, तेव्हा महापालिकेने हिंदमाता आणि वांद्रे येथील सखल ठिकाणी कर्मचारी तैनात करत पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, लोकलसेवा आणि रस्ते वाहतूक काहीशी कोलमडल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल्स रुग्णालय परिसर, मरोळसह लगतच्या परिसरात आणि वांद्रे येथील झोपड्यांच्या वस्तीत पाणी साचले, शिवाय कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार आणि लगतच्या चाळींमध्येही छोटी गटारे तुडुंब भरल्याचे निदर्शानास आले. मुळात येथील छोटी आणि मोठी गटारे साफ करण्यात आली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या, असे स्थानिकांनी सांगितले. साहजिकच, येथील छोटी गटारे मोठ्या गटारांना जोडण्यात आली आहेत. मोठ्या गटारांतील कचरा काढण्यात आलेला नाही आणि ही मोठी गटारे लगतच्या मिठी नदीत सोडण्यात आली आहेत. दुसरीकडे मिठीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह आहे. किंचितशा पावसाने घर-गल्ल्यांसह सखल चाळीत पाणी साचल्याने मोठा पाऊस झाल्यावर काय होईल? असा सवालही मरोळ आणि कुर्ला येथील रहिवाशांनी केला आहे.
मुंबईतील नागरी समस्यांचा अभ्यास असणारे वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात पालिका साफसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना धारेवर धरत नाही. आयुक्त असोत वा प्रशासन स्तरावरील अधिकारी, संबंधितांनी कंत्राटदारांना लगाम घातल्याशिवाय पावसाळ्यातील कामे मार्गी लागणारच नाहीत. दरवर्षी जसा पावसाळा येतो, तसे दरवर्षी पालिका साफसफाईची कामे हाती घेते. मात्र, पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. किमान या वर्षी तरी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना फैलावर घेतले, तर मान्सून दाखल होत असतानाच, ज्या ठिकाणची नालेसफाईची अथवा पावसाळापूर्व कामे शिल्लक आहेत, ती पूर्ण होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. (प्रतिनिधी)