न्या. लोया मृत्यू प्रकरणावरच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे अमित शाहांना फटकारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:14 PM2018-01-30T23:14:33+5:302018-01-30T23:14:51+5:30
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रांतून स्वतःची भूमिका व्यक्त करत आहेत. त्याप्रमाणेच आता त्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपा अध्यक्ष अमित शाहांना व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रांतून स्वतःची भूमिका व्यक्त करत आहेत. त्याप्रमाणेच आता त्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपा अध्यक्ष अमित शाहांना व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावर अचूक बोट ठेवणारं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी न्या. लोया मृत्यू प्रकरणावरून अमित शाहांवर मार्मिक टीका केली आहे.
व्यंगचित्रातून एक भलामोठा कुत्रा भाजपाचे अध्यक्ष अमित शाहांच्या मागे लागल्याचं दाखवण्यात आलं असून, या कुत्र्याच्या पाठीवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेली शंका, असं लिहिण्यात आलं आहे. तसेच या कुत्र्याला घाबरून अमित शाह जीव घेऊन पळत असल्याचंही पाहायला मिळतंय. त्यात मध्येच कबरीतून हात वर आल्याचं दाखवण्यात आलं असून, त्या कबरीवर न्या. लोया प्रकरण अशी पाटी लावण्यात आली आहे.
न्या. लोया हे नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी आपल्या सहका-याच्या मुलीच्या लग्नाला गेले असताना तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाले. मात्र लोया यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला, असा आरोप त्यांच्या बहिणीने गेल्या नोव्हेंबर महिन्यात केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते व त्यांच्या मृत्यूचा संबंध सोहराबुद्दीन खटल्याशीही जोडण्यात येऊ लागला.