न्या. धीरेंद्र वाघेला नवे मुख्य न्यायाधीश
By admin | Published: February 16, 2016 03:52 AM2016-02-16T03:52:27+5:302016-02-16T03:52:27+5:30
न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे ४० वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई : न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे ४० वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
न्या. मोहित शहा ८ सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून राज्याच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त होते व न्या. विजया कापसे ताहिलरामाणी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होत्या. सुरुवातीस गुजरात उच्च न्यायालयात नियुक्ती झालेले न्या. वाघेला गेली १७ वर्षे न्यायाधीश आहेत. मुंबईत येण्यापूर्वी न्या. वाघेला सात महिने ओडिशा उच्च न्यायालयाचे व त्याआधी दोन वर्षे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. येत्या ११ आॅगस्ट रोजी न्या. वाघेला यांची वयाची ६२ वर्षे पूर्ण होतील. त्याआधी सर्वोच्च न्यायालयावर बढती न झाल्यास ते जेमतेम सहा महिने मुख्य न्यायाधीश पदावर राहून निवृत्त होतील. (प्रतिनिधी)