...न्यायाचा विजय झाला! अयोध्या निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 07:03 PM2020-09-30T19:03:27+5:302020-09-30T19:05:42+5:30
भारतीय जनता पार्टीने कायमच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे.
पुणे : अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ.मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत मा.पाटील बोलत होते.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ.कालिदास कोळंबकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबत जनतेच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला राग उफाळून आला. त्या वेळच्या काँग्रेस सरकारने लालकृष्ण अडवाणी, डॉ.जोशी, उमा भारती आदी नेत्यांवर खटले दाखल केले. वर्षांनुवर्षे हा खटला चालला. आता सीबीआय न्यायालयाने या सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भारतीय जनता पार्टीने कायमच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे. या निकालाने न्यायाचा विजय झाला, असेही पाटील यांनी नमूद केले.
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.