जस्टीन बिबरसाठी पोलीस सज्ज
By admin | Published: May 10, 2017 12:29 AM2017-05-10T00:29:03+5:302017-05-10T00:29:03+5:30
देश-विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला गायक जस्टीन बिबरच्या नेरुळ येथील कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देश-विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला गायक जस्टीन बिबरच्या नेरुळ येथील कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमास सुमारे ३५ हजार प्रेक्षक अपेक्षित आहेत. त्यानुसार स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात आले असून कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पॉप सिंगर जस्टीन बिबर कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवारी नवी मुंबईत येत आहे. कार्यक्रमासाठी आयोजकांतर्फे ३५ हजारहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची शक्यता आहे. त्यानुसार देशभरातून बिबरचे चाहते नवी मुंबईत येणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळी ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तर ७५ अधिकारी बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. बुधवारी संध्याकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी दुपारी १ वाजल्यापासून चोख बंदोबस्त राहणार आहे. यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेश मार्गावर केवळ तिकीट असलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी प्रेक्षकांच्या वाहनांसाठी करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदान, नेरुळचे रामलीला मैदान, पामबीचलगत बामनदेव मैदान तसेच तेरणा कॉलेजचे मैदान याठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणावरुन स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी आयोजकांतर्फे शटल बस चालवली जाणार आहे. यादरम्यान वाहतुकीचा खोळंबा होवू नये याकरिता २०० वाहतूक पोलीस बंदोबस्तावर नेमल्याचे वाहतूक उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. त्याशिवाय आयोजकांचेही १०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत, तर स्टेडियमचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर देखील प्रेक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशाला बंदी असणार आहे.