भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:48 AM2024-10-07T10:48:32+5:302024-10-07T10:49:53+5:30
चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क , पुणे :भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या तेलंगणामधील पक्षाची महाराष्ट्र शाखा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात विलीन करण्यात आली आहे. बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तशी घोषणा रविवारी येथे केली.
मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. शरद पवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हरिभाऊ राठोड व बीआरएस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असे राठोड व सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते.
पंढरपूरमध्ये त्यांनी ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. मात्र, तेलंगणा विधानसभेतील पराभवाने महाराष्ट्रातही या पक्षाला घरघर लागली आहे. बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी यापूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांतील काही नेत्यांनी सोयीच्या असलेल्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.