पंकजा मुंडेंकडून प्रतिसाद नाही; आता ‘हा’ नेता BRSच्या टार्गेटवर, दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 11:20 AM2023-06-28T11:20:13+5:302023-06-28T11:20:51+5:30
पंकजा मुंडेंनी प्रतिसाद न दिल्याने आता बीआरएसने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
BRS In Maharashtra: तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आपल्या BRS पक्षाचा विस्तार करण्यासाठी चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. ६०० वाहनांचा ताफा, संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी केसीआर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. आता मात्र बीआरएस पक्षाने दुसऱ्या एका नेत्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांना केसीआर यांच्या बीआरएस पक्षाकडून ऑफर देण्यात आली आहे. बीआरएसने राजू शेट्टी यांच्याआधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची ऑफर दिली होती. तर या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी प्रतिसाद न दिल्याने आता बीआरएसने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी यांनी नाकारली बीआरएसची ऑफर
भारत राष्ट्र समितीकडून (बीआरएस) मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, गेल्या वेळी गुजरात मॉडेलच्या आमिषाने फसगत झाली आहे. आता के. चंद्रशेखर राव यांच्या आश्वासनाला फसणार नाही. एकला चलोची भूमिका आहे. स्वाभिमानी हातकणंगलेसह राज्यातील चार लोकसभेच्या जागा लढविणार आहे. प्रसंगी बारामतीची जागाही लढणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून के. चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. बीआरएसच्या विस्तारासाठी केसीआर यांनी महाराष्ट्राचा महासोहळा आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी तुळजाभवानीचेही दर्शन घेतले. त्याच्या या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.