कांबा पुलाला संरक्षण कठडा नाही!
By Admin | Published: June 5, 2017 03:01 AM2017-06-05T03:01:01+5:302017-06-05T03:01:01+5:30
कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : पाताळगंगा नदीजवळ असलेल्या कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी वा संबंधित शासनाचे अधिकारी लक्ष घालत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या पुलावरून चांभार्ली गावाकडे जाता-येताना नाइलाजास्तव प्रवाशांना या पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
चांभार्ली व कांबे गावांतील ग्रामस्थांना जोडून ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहे. मात्र, पूल आमदार निधीतून बांधून चार ते पाच वर्षे झाली. तरी संरक्षक कठडा अद्याप बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहन उलटून नदीपात्रात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुलावरून विद्यार्थी, स्थानिक नागरिकांची नियमित वर्दळ असते. शिवाय, या पुलामुळेच कांबा व चांभार्ली गाव जोडले गेले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या पुलावरून जाणे पसंत करतात. हा पूल एकेरी वाहतुकीसाठी अरुंद तर आहेच; परंतु पुलाला संरक्षक कठडा नसल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच पावसाळ्यात या पुलावरून लहान मुले गतकाठीच्या साहाय्याने मासे पकडत असताना काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. तरी संबंधितांनी तत्काळ लक्ष घालून संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.