कचराकोंडीने सत्ताधारी फैलावर
By admin | Published: May 4, 2017 02:57 AM2017-05-04T02:57:45+5:302017-05-04T02:57:45+5:30
उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद व्हावा, या करिता भर उन्हात दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचरा
फुरसुंगी : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद व्हावा, या करिता भर उन्हात दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचरा डेपोची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. वेगवेगळे आंदोलन करून कचराप्रश्नी ग्रामस्थ महापालिकेचे लक्ष वेधत आहेत.सकाळी अकराच्या सुमारास मंतरवाडी चौकापासून प्रतीकात्मक अंत्ययात्रेस सुरुवात झाली. कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांच्यासह काही ग्रामस्थ रामनामाचा गजर करीत टाळ वाजवित होते.
कचरा डेपो कायमस्वरूपी बंद झालाच पाहिजे, पालिका प्रशासन व राज्य शासनाचा निषेध असो, अशा घोषणा देत मंतरवाडी चौकातून अंत्ययात्रा कचरा डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली. पालिकेचा निषेध म्हणून संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी या ठिकाणी मुंडण करून घेतले.
या अंत्ययात्रेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंंदर कामठे, राहुल शेवाळे, तात्या भाडळे, विजय भाडळे, अर्चना कामठे, अजिंंक्य घुले, रोहिनी राऊत, अनिल टिळेकर तसेच दोन्ही गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. १४ एप्रिलला कचरा डेपोला आग लागल्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरागाड्या शहरात परत पाठवून आंदोलनास सुरुवात केली. ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पालिकेच्या शिष्टमंडळ तीन ते चार वेळा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या भेटीला आले. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या चर्चा निष्फळ ठरल्या. उलटपक्षी ग्रामस्थांनी भजन, जागरण गोंधळ, अर्धनग्न, घंटानाद आंदोलनांच्या माध्यमातून आपला निर्धार ठाम ठेवला आहे.
फुरसुंगी कचराडेपोला आग लागल्यानंतर पालकमंत्री या ठिकाणी एकदाही फिरकले नाही. महापौर तर सध्या परदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असताना यांचे परदेश दौरे होत म्हणजेच यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीच देणे-घेणे नाही.
- सुप्रिया सुळे, खासदार
आज अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून आंदोलनकर्ते दहा दिवस या प्रतीकात्मक मृत्यूचे सूतक पाळणार असून या दरम्यान कचराडेपोबाबत कोणाशीही कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाहीत.
- तात्या भाडळे
सेना नेत्यांचे उद्धव ठाकरे यांना साकडे
पुणे : कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या महापालिकेतील नगरसेवकांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशी तक्रार त्यांनी केली. अठरा दिवस झाले मात्र विषय अद्याप आहे तसाच आहे. पुण्याची स्थिती अवघड होत चालली असून आता तुम्हीच यातून पुणेकरांना सोडवा, असे साकडे त्यांनी ठाकरे यांना घातले. ठाकरे यांनी त्याची दखल घेत राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क करीत त्यांना मुख्यमंत्र्यांची या विषयावर त्वरित भेट घ्यावी, असे सांगितले.
महापौरांच्या घरासमोरच आंदोलकांनी टाकला कचरा
पुणे : कचऱ्याची समस्या आता चिघळत चालली आहे. मनसेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानासमोर कचरा टाकून आंदोलन झाले, काँग्रेसने महापालिका प्रवेशद्वारावर कचरा टाकून सत्ताधारी भाजपाचा निषेध केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात कचरा टाकणाऱ्यावरून झालेल्या एका खून प्रकरणाचा संदर्भ घेत पदाधिकारी आता आणखी बळी जाण्याची वाट पाहात आहे का, अशी घणाघाती टीका केली.
शिवसेनेने या आंदोलनात सहभागी न होता मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे धाव घेत त्यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. महापौर, पालकमंत्री यांच्या परदेशवारीबरोबर बुधवारी आयुक्त कुणाल कुमार हेही मुंबईला गेल्यामुळे आंदोलकांची साधी भेटही कोणी घेतली नाही. त्याचाही निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे गुरूवारी महापालिकेत येऊन आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रूपाली पाटील-ठोंबरे आदींनी महापौर मुक्ता टिळक यांच्या नारायणपेठ येथील निवासस्थानी कचरा फेकून आंदोलन केले.
काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेस भवन ते महापालिका असा मोर्चा काढून भाजपाचा निषेध केला. अरविंद शिंदे, नगरसेवक अजीत दरेकर, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे, सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)