Sanjay Raut: सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? हा कोण? सर्वत्र शोधाशोध आणि चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:57 AM2022-08-23T08:57:37+5:302022-08-23T08:58:05+5:30
Who is Kadaknath Mumbaikar: राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते.
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर सामनातील त्यांचे लेख कोण लिहितो याच्या मागे देखील ईडी लागली होती. राऊत जेलमध्ये असले तरी त्यांचे लेख कसे छापून येतात? तुरुंगातून ते कसे पाठवू शकतात याचे कोडे उलगडण्याच्या प्रयत्नात ईडी असताना एक महत्वाची माहिती हाती आली आहे.
राऊतांचे साप्ताहिक लेख आता कडकनाथ मुंबईकर लिहित आहे. हा कडकनाथ मुंबईकर कोण? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत तुरुंगात गेल्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सामनाची धुरा हाती घेतली आहे. गेल्याच आठवड्यातील सामनातील संजय राऊतांचा लेख हा कडकनाथ मुंबईकर या नावाने लिहून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण कडकनाथ मुंबईकर हे नाव सर्वांनाच नवखे होते. आता हा नवा गृहस्थ कोण अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सामनामध्ये अचानक कडकनाथ मुंबईकर कोण आला, हे पाहण्यासाठी सामनाच्या कार्यालयात विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा करण्यास किंवा माहिती देण्यास नकार दिला. हा उद्धव ठाकरेंचा विशेषाधिकार आहे, असे ते म्हणाले. मात्र, सूत्रांनुसार कडकनाथ मुंबईकर हे नाव साप्ताहिक कॉलमसाठी वापरण्यात आलेले एक पात्र आहे.
राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. राऊत दर रविवारी 'रोकठोक' हे सदर लिहितात. राऊत यांना कोठडीत संपादकीय किंवा लेख लिहिण्याची परवानगी नाही. तसेच या लेखामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राऊतांच्या अटकेनंतरची विधाने, घटनांचा संदर्भ होता. यामुळे हे लेख कोण लिहितोय, याची चौकशी ईडी करत आहे. कोठडीत असताना राऊत यांनी स्वत: कॉलम लिहिला की कुणाला तपशील दिला की सामनाच्या कर्मचार्यांनी राऊत यांच्या नावाने लिहीले? त्यामुळेच रविवारच्या 'कडकनाथ मुंबईकर'च्या बायलाईनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.