'कडकनाथ'मधील घोटाळ्याची चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 11:58 AM2019-12-19T11:58:15+5:302019-12-19T11:59:25+5:30
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आता विरोधी पक्षात आहेत. मात्र कडकनाथ प्रकरणी त्यांच्यावर चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मुंबई - एकेकाळचे सहकारी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि भाजप सरकारच्या काळात मंत्रीपद उपभोगणारे सदाभाऊ खोत यांच्यातील वैर अद्याप कायम आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आता विरोधी पक्षात आहेत. मात्र कडकनाथ प्रकरणी त्यांच्यावर चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. माजीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या खात्यात सातशे ते आठशे कोटी रुपयांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. ते रविवारी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात होते. कडकनाथमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असंही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. ठाकरे सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणार आहे. तसेच वीजबील देखील माफ करण्यात येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.