कणकवली वनक्षेत्रपाल सेवेतून बडतर्फ
By admin | Published: April 30, 2017 12:17 AM2017-04-30T00:17:31+5:302017-04-30T00:17:31+5:30
वनविभागात खळबळ : निवृत्तीच्या आदल्या दिवशीच शासनाची कारवाई
सावंतवाडी : मालकी क्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांना शासनाने निवृत्तीच्या आदल्या दिवशीच सेवेतून बडतर्फ केले आहे. मध्यंतरी सिंंधुदुर्ग लाचलुचपत विभागाने त्यांच्या कार्यालयावर टाकलेल्या धाडीमुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, त्यांचा थेट संबंध नसल्याने शासनाने तेव्हा कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, शनिवारी त्यांना शासनाने बडतर्फ केले आहे.
आर. एस. पाटील यांनी कणकवली वनक्षेत्रपाल म्हणून तीन वर्षांपूर्वी कार्यभार स्वीकारला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी वैभववाडी व देवगड येथे मालकी क्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणात एक वनपाल व वनरक्षक या दोघांना निलंबित करण्यात आले होते. तर आर. एस. पाटील यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती. या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना कणकवली वनक्षेत्रपाल या पदावरून हटविण्यातही आले होते. मात्र, त्यांना मॅट व उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. त्यांची खातेनिहाय चौकशी शासनाने सुरू केली होती. या चौकशीत शासनाकडून त्यांच्या पहिल्यापासूनच्या कारकिर्दीत त्यांच्या हातून घडलेल्या सर्व चुकांची चौकशी करण्यात येत होती. त्यात त्यांच्यावर सहा प्रकरणात दोषारोपही ठेवण्यात आले होते. यामध्ये शासकीय कर्तव्यात जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा करून शासकीय नुकसानीस कारणीभूत होणे, वरिष्ठांची दिशाभूल व फसवणूक करणे, जंगल संरक्षणात जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा करणे, शासकीय आदेश, वरिष्ठांचे आदेश दुर्लक्षित करून बनावट कागदपत्रास सहमती दर्शविणे, गैरहेतूने गुन्ह्यातील जप्त वाहन मुक्त करणे, शासकीय धोरणानुसार विकासकामांमध्ये अक्षम्य दिरंगाई करणे, खोटे दस्तऐवज कार्यालयात सादर करणे, मुंबई वनसंहितेचा भंग करणे आदी दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यानुसार वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांना कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांनी सेवेतून कमी करण्याची कारवाई प्रस्तावित केली होती. त्याचा अहवाल त्यांनी शासनाला पाठविला होता. त्याप्रमाणे शासनाचे अव्वल सचिव विजय खेडेकर यांच्या सहीने कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील यांना शनिवारी सायंकाळी उशिरा सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. याबाबतचा अध्यादेश सिंधुदुर्ग जिल्हा वनविभागाला उशिरा प्राप्त झाला. त्यांनी याची तत्काळ अंमलबजावणी केली.
महत्त्वाचे म्हणजे कणकवली वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील हे रविवारी सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा कार्यभारही कडावल वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. तत्पूर्वीच ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)