अवैध गर्भपात प्रकरणी ‘कदम’ हॉस्पिटलवर ठपका, समितीकडून चार पानांचा अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:37 AM2022-01-30T06:37:35+5:302022-01-30T06:38:18+5:30
illegal abortion case : आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी गठित केलेल्या सहा सदस्यीय समितीने शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांना अहवाल सादर केला. त्यातील बहुतांश मु्द्दे कदम कुटुंबीयांच्या विरोधात असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- महेश सायखेडे
वर्धा : आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी गठित केलेल्या सहा सदस्यीय समितीने शुक्रवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांना अहवाल सादर केला. त्यातील बहुतांश मु्द्दे कदम कुटुंबीयांच्या विरोधात असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम, डॉ. शैलेजा कदम, तसेच डॉ. कुमारसिंग कदम यांच्या अडचणी आणखी भर पडणार आहे. एकूण बारा मुद्यांचा समावेश असलेल्या या चार पानांच्या सविस्तर अहवालात सहाही सदस्यांनी अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये एमटीडी आणि पीसीपीएनडीटी कायद्याला कसे पायदळी तुडविण्यात आले, तेथे कुठले नियम पाळणे गरजचे होते, तसेच भविष्यात काय करायला पाहिजे याबाबतचे आपले मत नोंदविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांच्या माध्यमातून लवकरच राज्य शासनाला सादर होणार आहे.