कडोंमपा, कोल्हापूरात भाजपचाच महापौर - रावसाहेब दानवे
By Admin | Published: November 3, 2015 05:50 PM2015-11-03T17:50:14+5:302015-11-03T17:55:06+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कडोंमपामध्ये ५२ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनलेला असतानाही कडोंमपा व कोल्हापूरमध्ये भाजपचाचा महापौर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष बनलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केलेल्या असतानाही कडोंमपासह कोल्हापूरमध्येही 'भाजपाचा महापौर' बसवण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. दानवे यांच्या दाव्यामुळे सत्तेसाठी भाजपा काय फोडाफोडी करते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या कडोंमपा निवडणुकीत शिवसेनेला ५२ तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला ४२ जागा मिळाल्या आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली. तर कोल्हापूरमध्ये भाजपाला १३ जागा मिळाल्या आहेत.
मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदे दरम्यान दानवे यांनी कडोंमपात भाजपाच्या जागा पाचपटीने वाढल्याचे नमूद करत स्वबळावर लढण्याचा भाजपाचा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचे म्हटले. सत्तास्थापनेसाठी भाजपासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून निसर्गाचे नियम पाळून पक्ष पुढील पाऊले टाकेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. कोणत्याही परिस्थीती राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट करणा-या दानवेंनी मनसेचा पाठिंबा घेणार का या प्रश्नावर मात्र थेट उत्तर न देता तो प्रश्न मनसेलाच विचारावा, असे सांगितले.
दरम्यान कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.