कल्याणमधील आजदे गावातील तलावात यंदा गणेशमूर्तींचं विसर्जन नाही करता येणार, स्थानिकांच्या तक्रारीनंतर केडीएमसीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 01:05 PM2017-08-23T13:05:36+5:302017-08-23T13:07:29+5:30
यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
डोंबिवली, दि. 23 - यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मिलाप नगर (आजदे गाव) निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात दरवर्षी मोठया प्रमाणावर गणेशमूर्ती, दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन होत असते. यामुळे होणा-या प्रदुषणामुळे मिलाप नगर रहिवाशी संघाने हरित लवादाकडे धाव घेतली होती. स्थानिकांच्या तक्रारी दखल हरित लवादानं घेतली आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (कल्याण) यांनीही मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आजदे गावातील तलावात यावर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नसल्याचा निर्णय केडीएमसीने घेतला असून तसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी केले आहे.
दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेतर्फे अभिनव शाळेच्या निवासी विभागातील यश जिमखानामागील मोकळ्या जागेत कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. स्थानिक रहिवाशी, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व सन्मानिय पालिका सदस्यांनी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ई प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.