मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Published: June 10, 2015 11:15 PM2015-06-10T23:15:44+5:302015-06-11T00:32:06+5:30

महेश बाष्टे : माखजन ग्राममपंचायत भ्रष्टाचारप्रकरण चौकशीविना पडून

Kairachi basket in order of Chief Minister's order | मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

Next

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीमध्ये सन २०१०पासून झालेल्या गैरव्यवहारांची तातडीने चौकशी होऊन दोषींवर विनाविलंब कारवाई करावी, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होते. १३ मे २०१५ रोजी दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दोषींवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती माखजन बाजारपेठ व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष व भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करणारे माखजनचे ग्रामस्थ महेश बाष्टे यांनी दिली.
चित्रपटात पाहायला मिळते त्याप्रमाणे कागदावर विहीर आहे, पण प्रत्यक्षात विहिरीचा पत्ताच नाही. पैसे मात्र अदा करण्यात आलेले दिसतात. असे अनेक गैरव्यवहार गेल्या चार वर्षांत माखजन ग्रामपंचायतीमध्ये घडले. पाखाडी बांधणे, शौचालय बांधणे, गावतळी, रस्ते, गटारे आदी अनेक कामे कागदावर पूर्ण करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात यातील एकही काम झालेले नाही. माखजन ग्रामपंचायतीकडून विशेषत: तत्कालीन सरपंच सतीश कुंभार व ग्रामसेवक जितेंद्र मांगले यांच्या कालावधीत होत असलेल्या अपहाराविरूध्द महेश बाष्टेंसह ग्रामस्थांनी लढा द्यायला सुरुवात केली.
बाष्टे यांनी प्रथम ग्रामपंचायतीकडे काम दाखवा, अशी मागणी केली. परंतु काहीच माहिती न मिळाल्यावर बाष्टे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, ग्रामविकास मंत्रालय आदी ठिकाणी पाठपुरावा करून माहिती मिळवली. परंतु कोणत्याही स्तरावरून कारवाई न झाल्याचे बाष्टे यांनी पत्रकांसमोर नमूद केले. काही महिन्यांपूर्वी ही व्यथा बाष्टे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मांडून चौकशी करण्यासाठीचे पत्र दिले होते. परंतु काही उपयोग न झाल्याने बाष्टे यांनी मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई होण्यासाठी आदेश दिले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे अद्याप पालन न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बाष्टे हे पाठपुरावा करत असताना १२ जानेवारी २०१५ रोजी माखजन ग्रामपंचायतीची चौकशी झाली. परंतु कारवाई झाली नाही. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, देवरूखचे उडानशिवे, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपविभाग, बांधकाम विभाग आदी उपस्थित होते. त्यांनी चौकशी केल्यावर बोकरीची पाखाडी बांधणे, गावतळी, सुतारवाडी रस्ता करणे, सार्वजनिक शौचालय बांधणे, चव्हाणवाडी व हेमणवाडी पाखाडी बांधणे, आलेकर मोहल्ला गटार बांधणे, कुंभारवाडी नं. १ रस्ता बांधणे, कबूतर मोहल्ला खडीकरण करणे, राष्ट्रीय पेयजल योजना, कुंभारवाडी अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारत, समाज मंदिर संरक्षक भिंत, वाणीवाडी अंगणवाडी, मानोबा मंदिर रस्ता, कुंभारवाडी स्मशानभूमी, जिल्हा परिषदेकडून आलेले अनुदान, संपूर्ण स्वच्छता निधी, अजय अंकुश करंजेकर यांना हंगामी कामगार म्हणून दाखवलेले पैसे आदी विविध कामे दाखवून अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचे पत्र चौकशी अंती गटविकास अधिकारी यांना सादर केले होते. परंतु यावर गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने ग्रामविकास मंत्रालय व मुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागल्याचे बाष्टे यांनी पत्रकारांना सांगितले.
१२ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या चौकशीत तब्बल ३६ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
परंतु माखजन ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार यापेक्षा खोल असून, त्याची नीट चौकशी व्हावी, अशी मागणी बाष्टे यांनी केली आहे. माखजन ग्रामपंचायतअंतर्गत झालेला भ्रष्टाचार ३६ लाखांच्या कित्येक पटीने जास्त असून, तो जनतेसमोर आणावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
माखजन ग्रामपंचायतीकडून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकांकडून आर्थिक वसुली करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बाष्टे यांनी केली अशल्याने लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण जुलै २०१४ मध्ये पूर्ण झाले होते. परंतु २६ जानेवारी २०१५ रोजी बाष्टे यांनी रत्नागिरी येथे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता अद्याप लेखा परीक्षण पूर्ण न झाल्याने कारवाई होऊ शकत नसल्याचे सांगितले. वास्तविक लेखा परीक्षण जुलै २०१४मध्ये पूर्ण झाल्याचा अहवाल उपलब्ध आहे. मात्र, कारवाई का होऊ शकली नाही, असा सवाल बाष्टे यांनी केला आहे. या साऱ्या प्रकरणानंतर खळबळ माजली असून, चौकशी झाल्यानंतर सारे स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)

गैरव्यवहार चौकशी केव्हा...
माखजन ग्रामपंचायतीच्या अनेक व्यवहारांमध्ये काळबेरे असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करूनही त्याबाबत हालचाल होत नसल्याने लाल फितीच्या कारभाराचा नमुना पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. या साऱ्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महेश बाष्टे यांनी केली आहे. या मागणीमुळे माखजन, आरवली, संगमेश्वर परिसरात खळबळ माजली आहे.

Web Title: Kairachi basket in order of Chief Minister's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.