हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 02:34 AM2017-01-18T02:34:18+5:302017-01-18T02:34:18+5:30
हत्या केल्याप्रकरणी वासुदेव चंदर पाटील याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कल्याण : जमिनीच्या वादातून पुतण्याची कोयत्याने वार करुन हत्या केल्याप्रकरणी वासुदेव चंदर पाटील याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीस डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील अटाळी गावात राहणाऱ्या प्रवीण तुकाराम पाटील या २१ वर्षीय तरुणाची हत्या त्याचा काका वासूदेव चंदर पाटील याने केली होती. ३ एप्रिल २०११ रोजी रात्री वासुदेवने पुतण्या प्रवीणसोबत भांडण केले होते. त्याचा राग राग वासुदेवच्या मनात होता. वासुदेव व त्याचे दोन भाऊ काशीनाथ व तुकाराम पाटील यांची वडिलोपार्जित जमीन होती. त्याच्या वाटणीचा वाद होता. तुकाराम याचा मुलगा प्रवीण याच्यासोबत वासुदेव जमिनीच्या वाटणीवरुन वाद घालत होता. त्याला ३ एप्रिलच्या भांडणाचे निमित्त घडले. ४ एप्रिलला प्रवीणच्या घरासमोर वासुदेवने कोयत्याने १७ वार करुन प्रवीणला ठार मारले.
हा खटला कल्याण न्यायालयात सुरु होता. त्यात ११ साक्षीदार तपासले. या प्रकरणी प्रवीणचा दुसरा काका काशीनाथ याने फिर्याद दिली होती. वासुदेवला दारुचे व्यसन होते. तो तापट आणि भांडखोर स्वभावाचा होता. (प्रतिनिधी)