तासगावात ‘आबां’ची जागा घेतली ‘काकां’नी

By admin | Published: October 29, 2015 11:59 PM2015-10-29T23:59:42+5:302015-10-29T23:59:42+5:30

नगरपालिकेतील राजकीय वाद : नगराध्यक्षांच्या दालनात झळकला संजयकाकांचे छायाचित्र नगरपालिकेतील राजकीय वाद : नगराध्यक्षांच्या दालनात झळकला संजयकाकांचे छायाचित्र

'Kaka' took place in the hour of 'Aab' | तासगावात ‘आबां’ची जागा घेतली ‘काकां’नी

तासगावात ‘आबां’ची जागा घेतली ‘काकां’नी

Next

तासगाव : तासगाव पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पालिकेत भाजपचे बहुमत झाले. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुशिला साळुंखे नगराध्यक्षा झाल्या. या सत्ता बदलानंतर पालिकेतही राजकीय बदल होत आहेत. नगराध्यक्षांच्या दालनातील माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे छायाचित्र गुरुवारी काढले. त्याठिकाणी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे छायाचित्र लावले. त्यामुळे पालिकेत आबांची जागा काकांनी घेतल्याचे चित्र आहे.
साडेतीन वर्षापूर्वी झालेली तासगाव नगरपालिकेची निवडणूक तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांच्या गटाने एकत्रितपणे लढवली होती. दोन नगरसेवकांचा अपवाद वगळता सर्वच नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे तासगाव पालिकेत राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व असल्याचे वरकरणी चित्र होते. मात्र आबा आणि काका गटातील नगरसेवक आणि नेत्यांतही कुरघोड्या कायम होत्या. वर्षभरापूर्वी संजयकाकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांनीही भाजपचा रस्ता धरला. आबा आणि काका गटातील नगरसेवक एकमेकांविरोधात उभे राहिले. आबा गटाने कॉँगे्रसशी तडजोड करून सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. मात्र गेल्या दोन महिन्यांत झालेल्या घडामोडींनी पालिकेतील राजकारणाचे चित्र बदलून गेले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेत भाजपने आबा गटाकडे असलेली सत्ता हस्तगत केली. आबा गटातून भाजपमध्ये आलेल्या सुशील साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या नगराध्यक्षा झाल्या. सत्ता बदलानंतर पालिकेतही भाजपमय बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात असलेला माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे छायाचित्र काढून, त्याठिकाणी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे छायाचित्र लावले. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात खासदार संजयकाकांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न भाजपच्या नगरसेवकांकडून होताना दिसून येत आहे. या छायाचित्र बदलाचे राजकीय प्रतिबिंंब पालिकेच्या राजकारणात कसे उमटणार, याचीही चर्चा होत आहे. (वार्ताहर)


राष्ट्रवादीचे तेलही गेले अन् ...
आबा आणि काका गटाने एकत्रित निवडणूक लढविल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदा महिला आरक्षण होते. त्यावेळी विजया जामदार आणि जयश्री धाबुगडे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी चुरस होती. विजया जामदार यांना पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांनीच नगराध्यक्षांच्या दालनात आर. आर. पाटील यांचे छायाचित्र लावले. त्याचवेळी नगराध्यक्षपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयश्री धाबुगडे संजयकाकांच्या गटात सामील झाल्या. आता नव्याने झालेल्या घडामोडीत पहिल्यांदा संधी मिळालेल्या विजया जामदार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाने राष्ट्रवादीचे तेलही गेले अन्.. अशीच अवस्था झाली आहे.


आबांचे छायाचित्र उपनगराध्यक्षांच्या दालनात
नगराध्यक्ष भाजपचे असले तरी, उपनगराध्यक्ष सुरेश थोरात हे मात्र राष्ट्रवादीतच आहेत. नगराध्यक्ष बदलासाठी राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामध्ये उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांचाही समावेश होता. त्यामुळे भाजपनेही उपनगराध्यक्षांना अभय दिल्याची चर्चा आहे. आबांचे नगराध्यक्षांच्या दालनातील छायाचित्र काढले असले तरी, उपनगराध्यक्षांच्या दालनात मात्र छायाचित्र कायम आहे.

Web Title: 'Kaka' took place in the hour of 'Aab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.