‘काळू-बाळू’च्या तमाशाला नवसाचं देणं !
By admin | Published: April 18, 2016 01:24 AM2016-04-18T01:24:09+5:302016-04-18T01:24:09+5:30
विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यावर्षी दुष्काळामुळे बंद पडला.
- सचिन लाड, सांगली
विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यावर्षी दुष्काळामुळे बंद पडला. पण तमाशाची जन्मभूमी असलेल्या कवलापूर (ता. मिरज जि. सांगली) येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेत त्यांची हलगी पुन्हा कडाडणार आहे. यात्रा समितीच्या पुढाकारामुळे बंद पडलेल्या या तमाशाला नवसाचं देणं लाभलं आहे.
तमाशाचा सर्व खर्च यात्रा समितीने उचलला आहे. त्यानुसार कलाकारांची जुळवाजुळव व तमाशाची रंगीत तालीमही सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटामुळे हा तमाशा अडचणीत आहे. विजयादशमीला हा फड बाहेर पडतो. तेथून मे महिन्यात अक्षय्यतृतीयेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे सव्वादोनशे प्रयोग केले जातात. पण यंदा दुष्काळामुळे तमाशा चालणार नाही, असा विचार करुन फड बंद ठेवला आहे. मात्र सिद्धेश्वर मंदिरात देवासाठी नवसाचा खेळ करण्याच्या निमित्ताने तमाशा पुन्हा कवलापूरच्या मातीत बहरणार आहे.
कवलापूर यात्रा समितीने ‘काळू-बाळू’ तमाशाचे संचालक संपत खाडे यांची भेट घेतली. यात्रेत तमाशाचा खेळ करण्याची विनंती करत खर्चाची सर्व जबाबदारी उचलली. कलाकारांचा पगार, जेवण, जनरेटरची व्यवस्था यात्रा समिती करणार आहे.
दुष्काळामुळे यंदा तमाशा सुरू ठेवणे परवडणारे नसल्याने फड बंद ठेवला. कवलापूर यात्रेत आमचा नवसाचा खेळ असतो. ही परंपरा खंडित होते की काय, अशी भीती होती. पण यात्रा समिती मदतीला धावली. त्यामुळे आम्ही केवळ यात्रेपुरते दोन दिवस खेळ करणार आहोत.
- संपत खाडे, संचालक, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा