देशभरातील कलाकारांचा ‘कल्पना’ महोत्सव
By admin | Published: January 7, 2017 02:02 AM2017-01-07T02:02:55+5:302017-01-07T02:02:55+5:30
दोन दिवसांच्या कला हस्तव्यवसाय महोत्सवाचे आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे.
मुंबई : भारतातील बहुआयामी आणि विवधांगी कलाप्रकार आणि हस्तकलांची ओळख मुंबईकरांना करून देण्याच्या हेतूने टाटा ट्रस्टतर्फे प्रथमच ‘कल्पना’ या दोन दिवसांच्या कला हस्तव्यवसाय महोत्सवाचे आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे.
एरवी मुंबईसारख्या शहरी भागांना भारतातल्या अनेक कलाकार आणि कारागिरांच्या कामगिरीबाबत फारशी माहिती नसते. भारतासारख्या हजारो प्रकारच्या कला, हस्तव्यवसाय आणि परंपरांचा अंतर्भाव असलेल्या देशाची महती मुंबईकरांना व्हावी, हाच ‘कल्पना’ महोत्सवामागील उद्देश आहे. काळा घोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाच्या प्रांगणात ७ व ८ जानेवारी रोजी आयोजित महोत्सवात देशातील तीन ठिकाणचे कलाप्रकार आणि दहा ठिकाणच्या हस्तव्यवसाय कारागिरांची कामगिरी पाहायला मिळेल. याअंतर्गत बंगलोर येथील अट्टाक्कालरी सेंटर फॉर मूव्हमेंट आर्ट, भोपाळ येथील भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे देणारी धृपद संस्थान आणि कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील निनासम रंगभूमी समूहाचा समावेश असेल. हस्तव्यवसाय कलाप्रकारांमध्ये हातमाग, भरतकाम, चामड्याचे उद्योग, ढोक्रा धातू अशा विविध प्रकारांचा अनुभव मुंबईकरांना घेता येईल. (प्रतिनिधी)