काळू प्रकल्प - 451 कोटींच्या कामाचा ठेका मिळविण्यात गैरव्यवहार
By admin | Published: June 27, 2016 09:14 PM2016-06-27T21:14:35+5:302016-06-27T21:14:35+5:30
जिल्ह्यातील काळू धरण बांधकामाचा 451 कोटी रुपयांच्या कामाचा ठेका मिळवण्यात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. यासंदर्भात एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री
ठाणे : जिल्ह्यातील काळू धरण बांधकामाचा 451 कोटी रुपयांच्या कामाचा ठेका मिळवण्यात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. यासंदर्भात एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह सहा जणांविरुद्ध ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. बाबर यांच्याविरुद्धचा हा दुसरा गुन्हा आहे. रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पातील घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यापूर्वीच सुरू आहे.
राज्यभरातील 12 वेगवेगळ्या धरणांच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी दिले होते. त्यानुसार, डिसेंबर 2014 पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटबंधारे विभागाच्या कामांची चौकशी सुरू आहे. यातील रायगडच्या बाळगंगाप्रकरणी 25 ऑगस्ट 2015 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. ठाणो जिल्ह्यातील मुरबाडमधील काळू धरणाच्या प्रकल्पाचीही एसीबीने गेल्या वर्षभरापासून चौकशी केली. चौकशीत खत्री यांना या कामाचा ठेका मिळावा म्हणून बाबर तसेच जलसंपदा विभागाचे कोकण प्रकल्पाचे तत्कालीन मुख्य अभियंता बाबासाहेब पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता सतीश वडगावे, पाटबंधारे विभागाचे नवी मुंबईचे कार्यकारी अभियंता जयवंत कासार आणि तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता हरिदास टोणपे यांनी नियम धाब्यावर बसवून मदत केली. मूळ निविदेची किंमत ही 421 कोटी रुपयांच्या कामांची होती. ती 451 कोटी रुपये केल्याने मूळ रक्कम 3क् कोटींनी वाढली. प्रत्यक्षात त्यापैकी 108 कोटी रुपये आतार्पयत ठेकेदाराला मिळाले आहेत. धरणाचे काम केवळ 25 टक्के झाले असून आता ते बंद पडले आहे.
एकानेच चौघांचे एक कोटी भरले..
मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी 2009 मध्ये निविदा मागवल्या होत्या. प्रकल्पाचा ठेका मिळवण्यासाठी महालक्ष्मी, रवासा, एफए एंटरप्रायजेस आणि एफए कन्स्ट्रक्शन या चार कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. त्यातील महालक्ष्मी आणि रवासा या दोन वेगळ्या कंपन्या होत्या, तर एफए एंटरप्रायजेस आणि एफए कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंपन्या एकाच ठेकेदाराच्या म्हणजे निसार खत्री यांच्याच होत्या. पण, ठेका मिळवण्यात स्पर्धाच असू नये, म्हणून खत्री यांनीच चारही कंपन्यांची प्रत्येकी 25 लाख रुपयांप्रमाणो एक कोटीची बँक गॅरंटी भरली होती. निविदा प्रक्रियेसाठी उर्वरित कंपन्यांच्या नावाने बनावट निविदा भरणो, इसारा रकमेचा डिमांड ड्राफ्ट देणो आदी बेकायदेशीर कृत्ये केल्याचे चौकशीत आढळले. ठेका देताना स्पर्धा न होण्यासाठी बाबर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे पाच अधिकारी आणि एफए एंटरप्रायजेसच्या उर्वरित भागीदारांनी त्यांना सहकार्य केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.
शासनाची फसवणूक..
एफ.ए .एंटरप्रायजेसने बनावट कागदपत्रे तयार करून आणि ती खरी असल्याचे भासवून निविदा आणि बँक गॅरेंटी केआयडीसी (कोकण पाटबंधारे विकास महामंडळ)च्या कार्यालयात सादर करुन टेंडर प्रक्रीयेत भाग घेतला. अशा प्रकारे त्यांनी गुन्हेगारी कृत्य आणि कट करुन केआयडीसी आणि पर्यायाने शासनाची फसवणूक केली. या प्रकल्पावर काम करणा:या सर्व संबंधित अधिका-यांनी वरील बाबींकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करुन एफ.ए. एंटरप्रायजेसलाच ठेका मिळावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तसेच निविदेची किंमत चुकीच्या पद्धतीने ठेकेदाराच्या फायद्यासाठी वाढविल्याचेही उघड झाल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल अहेर यांनी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपअधीक्षक अजय आफळे हे अधिक तपास करीत आहेत.
...............
बाळगंगातील आरोंपींचा समावेश..
बाळंगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराकरिता यापूर्वीच गिरीष बाबर आणि भाऊसाहेब पाटील यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आता सतीश वडगावे, जयवंत कासार आणि हरिदास टोणपे या आणखी तीन अधिका:यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रंनी दिली.