कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

By admin | Published: August 3, 2016 03:08 AM2016-08-03T03:08:05+5:302016-08-03T03:08:05+5:30

सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

Kalyan, Bhiwindala alert alert | कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

Next

टीम लोकमत,

ठाणे- सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भरतीच्या वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदरच्या अनेक भागांत, खाडीकिनारी पाणी शिरले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक खोळंबली. भातसा धरण ८६ टक्के भरल्याने त्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही संततधार पाऊस सुरू असल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील नदीकाठच्या ४१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असली तरी अद्याप कोठेही पूर आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भातसा नदीतील पाणीपातळी वाढली आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील अन्य नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.
कल्याणचा गणेशघाट, गांधारी परिसर, डोंबिवलीचा रेतीबंदर परिसर, कोपर स्थानकालगतचा भाग, मुंब्रा येथील खाडीकिनारा, दिव्यातील खाजण जमिनीवरील घरांचा परिसर, कल्याणचा वालधुनीचा पट्टा, उल्हासनगरला खेमाणी नाल्याचा पट्टा, बदलापूरला चौपाटीचा परिसर, टिटवाळ््यात काळू नदीवरील रूंदे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. वासुंद्री येथे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शिवाय रिजन्सीचा परिसर पाण्याखाली गेला. टिटवाळा मंदिर रोड परिसरातही पाणी आहे. भिवंडी-वाडा रस्त्यावरील शेलार नदीनाका येथे पावसाचे पाणी शिरले. शेती पाण्याखाली गेली. म्हारळ गाव परिसरात पाणी शिरले.
धरणे पाण्याने भरत असली तरी अद्याप पुराचा धोका नाही, असा निर्वाळा जलसंपदा विभागाने दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरु राहिली आणि पुढील काळात धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तरी पुरासारखी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
भातसा ८६ टक्के भरले आहे. बारावी धरण ६६ टक्के भरले आहे. तानसा धरण १०० टक्के भरले आहे. जलसंपदा विभागाकडील ११ लघू पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
या तलावांच्या सांडव्यावरून पाणी वाहते आहे आणि आजूबाजूच्या शेती व परिसरात ते पसरत असल्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. मात्र हा विसर्ग खूपच कमी क्षमतेचा असल्याने त्यापासून कुठलाही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.
उल्हास नदीमध्ये आंध्र आणि बारवी धरणातून पाणी येते. या नदीतून वाहणाऱ्या पाण्याची धोक्याची पातळी मोहने, जांभूळ व बदलापूर बॅरेज येथे मोजली जाते.
सध्या तरी ती धोकादायक पातळीपेक्षा खाली आहे. मात्र उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा आणि त्या परिसरातील पावसाचा जोर जास्त राहिला, तरच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ऊ. ल. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)
41 गावे सतर्कतेचा इशारा दिलेली
>शहापूर : साजीवली, सरलांबे, कासगांव, तुटे, कवडास, सापगांव, बामणे, कुटघर, अंताड, हिव, काजळविहीर, मोहोपाडा, कलमपाडा, भातसई, वाशिंद, साने, पाली
भिवंडी : कमालवाडी, सोर, वावली, वांदे, अटकले, भादणे, चित्रपाडा, अजुनली, पिसे, देवरंग, बाबगांव, चोरडपाडा, कोने आणि जंडजर
कल्याण : सारसे, कोलस, ओझरली, कोडरी, सांगोडी, मोंडे, टिटवाला, अटली, आंबिवली आणि वडवली

Web Title: Kalyan, Bhiwindala alert alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.