कल्याणमधील 'तो' अॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 05:35 PM2024-05-26T17:35:58+5:302024-05-26T17:43:11+5:30
कल्यामध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
Kalyan Acid Attack : काही दिवसांपूर्वी कल्याणमध्येकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीवर कल्याण पूर्वेकडील पार्किंग परिसरात दोन चोरट्यांनी अॅसिड हल्ला करुन तिच्याकडील लॅपटॉप घेऊन पळ काढल्याची तक्रार करण्यात आली होती. अॅसिड हल्ल्यामुळे तरुणी काही प्रमाणात जखमी झाली होती तर तिचे कपडे देखील जळाले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर तपास सुरुवात करण्यात आला होता. पोलीस तपासात तरुणीने सांगितल्याप्रमाणे काहीच घडलं नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
१८ मे रोजी कल्याण स्टेशन परिसरात दोन चोरट्यांनी आपल्यावर अॅसिड हल्ला करुन मित्राचा लॅटपॉप घेऊन पळ काढल्याची तक्रार अंजली पांडे नावाच्या तरुणीने पोलिसांत दिली होती. अंजलीच्या म्हणण्यांनुसार ती अंधेरीवरुन मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याणला गेली होती. मात्र चोरट्यांनी आपल्यावर हल्ला करुन तो लांबवला असे अंजलीने म्हटलं होतं. मात्र पोलीस तपासात अंजलीने अॅसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आलं आहे. केवळ काही पैशांसाठी तिने हे सगळं कृत्य केल्याचे उघड झालं आहे.
नेमकं काय घडलं?
अंधेरी इथे राहणाऱ्या अंजलीला कल्याणमधील तिच्या एका मित्राने यूपीएस परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा लॅपटॉप दिला होता. अंजली लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करेल, अशी प्रामाणिक भावना त्याच्या मनात होती. मात्र मित्राच्या मदतीचा गैरफायदा अंजलीने घेतला आणि अभ्यास करण्याऐवजी अॅसिड हल्ल्याचा बनाव रचला आणि लॅपटॉप विकून टाकला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
बरेच दिवस झाल्याने मित्राने अंजलीकडे लॅपटॉप परत मागण्यास सुरुवात केली होती. मात्र पैशांची चणचण असल्याने तिने लॅपटॉप परत देण्याऐवजी तो विकून टाकण्याचा निर्णय घेतला. अंजलीने लॅपटॉप विकून पैसे मिळवले पण मित्राला परत काय द्यायचे या विचारात ती होती. अशातच तिने अॅसिड हल्ल्याची योजना आखली आणि लॅपटॉप चोरीला गेल्याचे सांगितले. योजनेनुसार अंजलीने १८ मे रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वकडील
एका दुकानातून कास्टिंग सोडा विकत घेतला आणि स्वत:च्या अंगावर फासला. यामुळे तिच्या मानेवर जखमेसारखे डाग दिसू लागले. त्यानंतर तिने चोरट्यांनी हल्ला करुन लॅपटॉप चोरल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिसांत केली.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला. आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासत असताना पोलिसांना अंजली एका दुकानातून कास्टिंग सोडा विकत घेत असल्याची आढळली. पोलिसांनी दुकानात जाऊन याची चौकशी केली असता दुकानदाराने याची पुष्टी केली. त्यामुळे पोलिसांना अंजलीवर संशय बळावला आणि त्यांनी तिची चौकशी सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत अंजलीने सगळी हकीकत सांगितली आणि पैशांसाठी लॅपटॉप विकल्याची कबुली दिली. पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांकडून आता अंजलीवर कारवाई करण्यात येत आहे.