संमेलन यजमानपदासाठी कल्याण, डोंबिवलीचा हट्ट
By admin | Published: September 18, 2016 02:09 AM2016-09-18T02:09:00+5:302016-09-18T02:09:00+5:30
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांंच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी डोंबिवली आणि कल्याण या स्थळांची पाहणी केली.
डोंबिवली/कल्याण : एखाद्या शहरात संमेलन झाले म्हणजे ते वाङ्मयदृष्ट्या सकस झाले असे नव्हे, असा टोला लगावत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांंच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी डोंबिवली आणि कल्याण या स्थळांची पाहणी केली. एकाच मनपातील या दोन्ही संस्थांनी स्वतंत्र संमेलनासाठी हट्ट धरल्याने या पाहणीनंतर अखेर समितीला सीमाप्रश्नामुळे गाजणारे बेळगाव गाठावे लागले. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळात होणाऱ्या या संमेलनाच्या स्थळाचा फैसला येत्या रविवारी होणार आहे. ते भाजपाच्या प्रभावाखालील क्षेत्रात असेल की शिवसेनेच्या, याचे गुपितही त्याच दिवशी उलगडेल.
डोंबिवलीतील आगरी युथ फोरम आणि कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. ही दोन्ही शहरे एका महापालिकेच्या हद्दीत असल्याने दोन्ही प्रस्ताव एकत्र करून संयुक्तपणे आयोजन करावे, असे मत मांडून काहींनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याला फारसे महत्त्व न देता दोन्ही आयोजक संस्थांनी आपलाच हट्ट कायम ठेवल्याने साहित्य महामंडळाच्या समितीने दोन्ही शहरांतील जमेच्या आाणि उणिवेच्या बाजू समजून घेतल्या. आयोजकांचेच एकमत नसल्याने पाहणीनंतर अखेर त्यांनी बेळगावच्या दिशेने मोर्चा वळवला. वस्तुत: संमेलनासाठी निमंत्रण दिलेल्या संस्थांत फारशी मोठी शहरे नसल्याने डोंबिवली-कल्याण या शहरांचे पारडे जड होते; परंतु आपल्याच हट्टावर आयोजक ठाम राहिल्याने समितीला बेळगावचीही पाहणी करावी लागली. (प्रतिनिधी)
महापौरांची डोंबिवलीला दांडी
वस्तुत: महापौर हे पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शहरांचे प्रथम नागरिक असतात. पण, मूळचे कल्याणकर असलेल्या राजेंद्र देवळेकर यांनी संमेलनस्थळांच्या पाहणीवेळी डोंबिवलीतील बैठकीला दांडी मारून कल्याणच्या बैठकीला हजेरी लावली. पालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतूद ही एकाच शहरासाठी असल्याप्रमाणे त्यांनी समितीसमोर सादरीकरण केले. त्यांनी
फक्त कल्याण शहराची बाजू उचलून धरल्याने डोंबिवलीच्या साहित्यप्रेमींत नाराजी
पसरली.