कल्याण- डोंबिवलीचा कचरा उंबर्डेतच
By admin | Published: April 21, 2015 01:35 AM2015-04-21T01:35:51+5:302015-04-21T01:35:51+5:30
केडीएमसी प्रशासनाने तळोजा सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासंदर्भातला दाखल केलेला प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे.
कल्याण : केडीएमसी प्रशासनाने तळोजा सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासंदर्भातला दाखल केलेला प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या महासभेने उंबर्डे येथेच कचरा टाकला जाईल, या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. जून २०१३ मध्ये झालेल्या या ठरावाची महिनाभरात अंमलबजावणी करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. दरम्यान, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ महासभा तहकू ब करण्यात आली.
घनकचऱ्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारल्यानंतर ३१ मार्च २०१५ च्या शासनपत्रानुसार तळोजा येथील सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासंदर्भात निर्णय घेण्याकामी सोमवारच्या महासभेत प्रशासनाने प्रस्ताव ठेवला. याआधीही २० जून २०१३ झालेल्या महासभेत तळोज्याच्या प्रकल्पात सहभागी व्हायचे की स्वत: प्रकल्प राबवायचा, असे दोन पर्याय होते. यावर तळोजा येथील प्रकल्प खर्चिक असल्याने डम्पिंगसाठी राखीव असलेल्या उंबर्डे येथील आरक्षित जागेला महासभेने पसंती दिली होती. त्यामुळे सोमवारच्या महासभेत पुन्हा हा विषय चर्चेला येताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर चांगलीच झोड घेतली. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच आजची परिस्थिती ओढवल्याचा आरोप या वेळी केला.
डम्पिंगप्रश्नी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी केली असता शासनाची भूमिका हीच माझी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिले. तळोजा खर्चिक असेल तर शासनाकडून अनुदान मागण्यात येईल, असेही ते म्हणाले. उंबर्डे येथे महिनाभरात अंमलबजावणी न झाल्यास आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणला जाईल, असाही या वेळी निर्णय घेण्यात आला. दरम्यान, उंबर्डेला डम्पिंग नेण्यास विरोध कायम असल्याचे स्थानिक नगरसेविका पुष्पा भोईर यांनी स्पष्ट केले असून अन्य आरक्षित जागांवरही कचरा टाका, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. परंतु, त्यांची मागणी विचारात घेण्यात आली नाही. (प्रतिनिधी)