कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक स्मार्ट करणार
By admin | Published: June 28, 2016 02:37 AM2016-06-28T02:37:21+5:302016-06-28T02:37:21+5:30
कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीच्या नव्या आराखड्यात वाहतूक व्यवस्था आमूलाग्र सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
मुरलीधर भवार,
कल्याण- कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीच्या नव्या आराखड्यात वाहतूक व्यवस्था आमूलाग्र सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील गर्दी कमी करून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार हा बदल करण्यात आला आहे.
दोन हजार २७ कोटींचा हा सुधारित आराखडा गुरूवारी राज्य सरकारला सादर केला जाईल. पहिल्या फेरीतील आराखडा एक हजार ४४५ कोटींचा होता.
चुका टाळून नव्याने तयार केलेला आराखडा परिपूर्ण असल्याने स्मार्ट सिटीच्या या फेरीत कल्याण-डोंबिवलीचा नक्कीच नंबर लागेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रस्ताव केंद्राकडेच
महापालिकेने पहिल्या फेरीसाठी १५ डिसेंबर २०१५ ला आराखडा सादर केला होता. तेव्हा पालिकेचा ३८ वा नंबर लागला होता. दुसऱ्या फेरीचा आराखडा तयार करण्यापूर्वी पालिकेने स्मार्ट सिटी शिखर परिषद भरविली होती. राज्याकडून दहा स्मार्ट शहरे तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने हा प्रस्ताव केंद्राकडे सादर होणार की राज्याकडे असा संभ्रम निर्माण झाला. पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता तो केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
>निधी मिळणार कुठून? : केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, खाजगी गुंतवणूकदार व परदेशी कंपन्यांकडून स्मार्ट सिटीसाठी निधीची उभारणी केली जाणार आहे.
>मुंबई, ठाण्याचीही निवड नक्की : २०१७ मध्ये मुंबई, ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या दोन्ही शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला मतदारांनी चांगला कौल दिल्याने ही शहरेही स्मार्ट करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्यातील भाजप सरकार करेल, अशी चिन्हे आहेत.
>नागरिकांना हवंय तरी काय?
स्टेशन परिसर मोकळा, विकसित हवा, वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक यंत्रणा सुसज्ज करणे याला प्रथम पसंती.घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबविण्यावर भर.ग्रीन पार्कचा मुद्दा आणि वॉटर फ्रंट-जल वाहतुकीचा क्रमांक त्यापुढचा.