ठाकरे गट करेक्ट कार्यक्रम करणार! श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 03:43 PM2024-03-23T15:43:20+5:302024-03-23T15:44:37+5:30
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केल्यास कल्याणची लोकसभा निवडणुकीची लढत चुरशीची होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: लोकसभेचा पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस राहिले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीचे जाटावाटप आणि उमेदवारी अद्याप निश्चित होताना दिसत नाही. तसेच उमेदवारी मिळावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या दिल्लीवारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली असून, केदार दिघे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी ठाकरे गट चाचपणी करत आहे. याचाच एक भाग म्हणून धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यास श्रीकांत शिंदे यांना विजयासाठी वेगळी रणनीति आखावी लागेल. तसेच ही लढत अधिक चुरशीची होऊ शकते, असा कयास बांधला जात आहे.
श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी?
श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याणमधून उमेदवारी देण्याच्या चर्चांबाबत केदार दिघे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. मीडियाशी बोलताना केदार दिघे यांनी सांगितले की, कल्याणची उमेदवारी मला मिळणार असल्याच्या चर्चांबाबत मीडियातूनच माहिती मिळत आहे. पक्षाकडून अद्याप तसे काही सूतोवाच करण्यात आलेले नाही. पण, शिवसेना ठाकरे गट या पक्षात आधीपासूनची परंपरा आहे की, पक्षातील वरिष्ठांचा आदेश आला की त्याचे पालन केले जाते. जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला कल्याणबाबत तसे आदेश दिला, तर त्याचे पालन करेन. ही निवडणूक लढण्यास माझी कोणतीही हरकत नसेल. परंतु, तसा कोणताही निरोप मला अद्याप आलेला नाही. मात्र, जर तसा आदेश आला तर नक्कीच त्याचे पालन करेन, अशी सूचक प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली.
दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे नेहमी सांगताना दिसतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना विजयापासून रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून केदार दिघे यांचे नाव पुढे येत असल्याचे म्हटले जात आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ठाणे- कल्याण या भागात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कल्याणमध्ये नेमके काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.