कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीचा ५० टक्के खर्च केंद्र उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 07:27 PM2017-07-31T19:27:16+5:302017-07-31T19:30:35+5:30

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे करत असलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील ५० टक्के वाटा उचलण्यास आज मान्यता दिली.

Kalyan-Thane-Mumbai will take 50 per cent of the cost of transportation of water | कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीचा ५० टक्के खर्च केंद्र उचलणार

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीचा ५० टक्के खर्च केंद्र उचलणार

Next

ठाणे, दि. ३१ - कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे करत असलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील ५० टक्के वाटा उचलण्यास आज मान्यता दिली. श्री. गडकरी यांच्यासमोर या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल, तसेच प्राथमिक सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण सोमवारी झाले असता त्यांनी ठाणे महानगरपालिकेला प्रकल्पाचा अंतिम सविस्तर अहवाल बनवण्याचे निर्देश दिले. 
याप्रसंगी खा. डॉ. शिंदे, राजन विचारे आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. ठाणे आणि त्यापुढील रहिवाशांना किफायतशीर प्रवासाचा समर्थ पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू व्हावी, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी खा. डॉ. शिंदे आणि राजन विचारे यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात श्री. गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेत व्यवहार्यता अहवाल आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे सादरीकरण सोमवारी श्री. गडकरी यांच्याकडे झाले. 
पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भाईंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ४५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा भाईंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. श्री. गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्यास मान्यता दिली आहे. 
कल्याण/ठाण्याला मिळणार अँफिबियस बस 
हायब्रिड टेक्नॉलॉजीवर आधारित, पाणी आणि रस्त्यावरही चालू शकणारी अँफिबियस बस कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. डॉ. शिंदे आणि राजन विचारे यांनी केली. त्यावर आयात करण्यात आलेली एक अँफिबियस बस जेएनपीटी येथे उपलब्ध असून ती ठाणे महापालिकेला देण्याची तयारी श्री. गडकरी यांनी दाखवली. त्यामुळे लवकरच ठाणे महापालिकेच्या ताब्यात ही बस येणार असून सध्या उपलब्ध असलेल्या जेट्टींच्या आधारे तिची वाहतूकही सुरू करता येणार आहे. 
महामार्गावरील वाहतूक कोंडीतूनही मुक्तता 
ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर दिवसभर होणारी वाहतूक कोंडी, तसेच तीन हात नाका येथील सिग्नलमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा यावर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ग्रेड सेपरेटर प्रकल्पाचे सादरीकरणही याप्रसंगी श्री. गडकरी यांच्यासमोर झाले. त्यावेळी ठाणे महापालिकेने मुलुंड पूर्व हद्दीवरील टोल नाका ते खारेगाव टोलनाका पर्यंतचा रस्ता वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. गडकरी यांनी दिले. त्यामुळे लवकरच ठाणेकरांची महामार्गावरील वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होणार आहे.
 

Web Title: Kalyan-Thane-Mumbai will take 50 per cent of the cost of transportation of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.