कल्याण विजय दिवस व मराठा आरमाराची मुहूर्तमेढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 08:34 AM2017-10-24T08:34:18+5:302017-10-24T08:35:15+5:30

मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबर १६५७ या तारखेस अनन्यसाधारण महत्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले.

Kalyan Vijay Divas and the Maratha Navy | कल्याण विजय दिवस व मराठा आरमाराची मुहूर्तमेढ

कल्याण विजय दिवस व मराठा आरमाराची मुहूर्तमेढ

googlenewsNext
ठळक मुद्दे मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबर १६५७ या तारखेस अनन्यसाधारण महत्व आहे.अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले.महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले.

-प्रतिश खेडेकर

मुंबई- मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबर १६५७ या तारखेस अनन्यसाधारण महत्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस. ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. 
दुर्गाडीचा पहिला दगड कधी रचला गेला, अथवा आरमाराचा पहिला पाया रचला, याबाबत इतिहास मौन बाळगून आहे. कसेही असले तरी, कल्याणचे स्वातंत्र्य दिन हेच खऱ्या अर्थाने मराठा आरमार दिन आहे. कारण इथेच मराठेशाहीचा पहिला आरमारी दुर्ग बांधला गेला – दुर्गाडी.

दीड शतकाहून जास्त काळ आपले सागरी स्वातंत्र्य हरपून बसलेल्या भारतात, स्वतःचे आरमार उभारणारे, व सागरावर पाश्चात्यांशी दोन हात करू पाहणारे फक्त मराठेच.

कोळी, भंडारी, आगरी, दाल्दी, सारख्या दर्यावर्दी जमातींनी या नूतन आरमाराची धुरा सांभाळली. पुढे कान्होजी आंग्रे, आनंदराव धुळप, बाजीराव बेळोसे सारखे जातिवंत सरदार नावारूपाला आले.

“ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र” या तंत्राप्रमाणे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी व कुलाबा सारखे जलदुर्ग बांधले. गुराब, गलबत, पाल, शिबाड, मछवे, सारखी जहाजे बांधून समुद्रास आपले मांडलिक केले. 

या आरमारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास नवीन चेतना मिळाली. मराठी जहाजे पश्चिमेस येमेनपासून पूर्वेस इंडोनेशिया पर्यंत गेल्याची नोंद सापडते. पोर्तुगीजांवर अंकुश राहावा म्हणून मस्कत(ओमान) च्या इमामाशी व्यापारी व राजकीय संबंध स्थापित केले. 

सुरुवातीस आरमाराचे प्रत्येकी दोनशे जहाजे असे करून दोन सुभे होते व प्रत्येकावर एक सुभेदार. संभाजी महाराजांनी आरमाराची पुर्नरचना केली. आरमारात पाच सुभे, व प्रत्येक सुभ्यात ५ मोठी गुराबे व १५ गलबते. सरसुभेदार, हे नवीन पद  निर्माण केले. गोविंदजी जाधव, सिदोजी गुजर, व कान्होजी आंग्रे हे क्रमाने संभाजी, राजाराम, व महाराणी ताराबाई यांचे सरसुभेदार होते. शाहूकाळात सरकारचे व सरदारांचे असे एकूण पाच मराठा आरमारे अस्तित्वात होती - आंग्रे, पेशवे, कोल्हापूर, गायकवाड, व सावंतवाडीकर.

मराठ्यांना समकालीन युरोपियन हेतुपुरस्सरपणे “लुटारू” म्हणून संबोधित. मुळात मराठे फक्त जहाजाकडे परवाना आहे किंवा नाही हे तपासत. परवाना नसणाऱ्या जहाजाला अटक होत असे.  या हेतुपुरस्सर बदनामी मागे पाश्चात्यांची मराठ्यांबद्दल असलेली भीतीच अभिप्रेत आहे.

१८व्या शतकातील भारताचा इतिहास हा मराठ्यांचाच इतिहास आहे. आणि आरमारा शिवाय मराठ्यांचा इतिहास अपूर्ण आहे.  महाराष्ट्रीयांच्या शौर्याची ही आरमार रुपी पताका प्रत्येकाच्या विचारजहाजावर अभिमानाने फडकत राहिली पाहिजे.


(लेखक इतिहासप्रेमी आणि अभ्यासक आहेत.)

Web Title: Kalyan Vijay Divas and the Maratha Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.