कल्याणचा सोनसाखळी चोर कोट्यधीश

By Admin | Published: May 9, 2017 02:26 AM2017-05-09T02:26:07+5:302017-05-09T07:06:58+5:30

ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्याणमधील सोनसाखळी चोराचे देशभरातील काही प्रमुख शहरांमध्ये रॅकेट असल्याची

Kalyan's son-in-charge Chor Kotyanad | कल्याणचा सोनसाखळी चोर कोट्यधीश

कल्याणचा सोनसाखळी चोर कोट्यधीश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्याणमधील सोनसाखळी चोराचे देशभरातील काही प्रमुख शहरांमध्ये रॅकेट असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या धंद्यातून त्याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केली असून, त्याचे आंबिवलीत घर, दिल्लीत दोन बंगले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या धनाढ्य सोनसाखळी चोरास एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
तोतया पोलीस अधिकारी बनून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या कल्याणनजीकच्या आंबिवली येथील नासिर खान याला दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) ठाण्यात गुन्हा दाखल असलेला नासिर हा ठाणे पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षांचा नासिर जवळपास १५ ते २0 वर्षांपासून गुन्हेगारी जगताच्या संपर्कात आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणसह दिल्ली, कोलकाता आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमध्येही त्याचे रॅकेट आहे. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावणे हा त्याचा प्रमुख धंदा आहे. या धंद्यातून त्याने खूप मालमत्ता जमवल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्याच्या मालमत्तेच्या तपशिलाला पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तीन वर्षांपूर्वी नासिर याला ठाणे पोलिसांनी अटक केली होती, परंतु जामिनावर सुटल्यानंतर त्याने आपले बस्तान दिल्लीत हलवले. दिल्लीत एका रहिवाशाला फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र या रहिवाशाच्या सतर्कतेमुळे तो दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नासिरला न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Kalyan's son-in-charge Chor Kotyanad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.