ताम्रपाषाण युगाची साक्षीदार ‘काजी गढी’
By Admin | Published: January 20, 2017 08:53 AM2017-01-20T08:53:12+5:302017-01-20T08:53:12+5:30
अनेक वर्षांपासून भारतीय पुरातत्त्व विभागाची संरक्षित वास्तू असलेली ऐतिहासिक प्राचीन मातीच्या काजी गढीच्या तळाशी प्राचीन काळी ताम्रपाषाण युगातील नागरी वस्ती असावी असा अंदाज आहे.
अझहर शेख, आॅनलाइन लोकमत
नाशिक, of. 20 - गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय पुरातत्त्व विभागाची संरक्षित वास्तू असलेली ऐतिहासिक प्राचीन मातीची जुनी गढी अर्थात काजी गढीच्या तळाशी प्राचीन काळी ताम्रपाषाण युगातील नागरी वस्ती असावी, असा अंदाज वेळोवेळी झालेल्या उत्खननामधून संबंधित तज्ज्ञांनी लिहून ठेवला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने काजीची गढी उत्खनन व संशोधनासाठी औत्सुक्याचा विषय असला तरी आज या गढीवर मोठ्या प्रमाणात लोकांची वस्ती असल्यामुळे उत्खनन व संशोधनाचा मार्ग बंद झाल्यासारखा आहे.
उत्क्रांतीनंतर विविध प्राचीन युगातील मानव आणि त्याचे बदलत जाणारे राहणीमान, त्याला अवगत होणाऱ्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुत असेच आहे. प्रत्येक युगाची संस्कृती आणि त्या संस्कृतीचा मानव हा वेगळेपणाने जीवन जगला. त्यांचा आहार, पोशाखही आगळाच होता. अशाच काही संस्कृतींचा प्राचीन इतिहास नाशिकच्या गोदाकाठी आहे. गावठाण भागात गोदाकाठालगत विविध युगांमध्ये मानवी अधिवास असल्याच्या खाणाखुणा भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून शोधल्या आहेत. त्या आधारे अभ्यास व पडताळणी करून संबंधित तज्ज्ञांनी त्याबाबतचा इतिहासही लिहून ठेवलेला आर्हे.$िउत्क्रांतीनुसार जसा मानव बदलत गेला, तसे त्याचे राहणीमानही बदलले. ताम्र, अश्म असे सर्वच युग हे आपापल्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण कलेसाठी ओळखले जातात. या प्रत्येक युगाची संस्कृती अद्वितीय राहिली आहे. अशाच काही युगांमधील मानवी वस्ती, ते वापरत असलेली मातीची भांडी, जळालेले लाकूड, हाडे, राखेचे ढिगारे, विहिरी, मातीपासून तयार केलेल्या भेंड्यांच्या भिंती, कोळसा झालेली भांडी, मातीची कौलं, काचेच्या बांगड्या, चकाकणारी भांडी जे आजपासून सुमारे २५०० ते ३५०० वर्षांपूर्वीचे असावे आणि उत्खननादरम्यान ते पुरातत्त्व विभागाला आढळून आले. ख्रिस्तपूर्व ५०० ते १५०० मधील ताम्रयुगातील मानवी अधिवास याठिकाणी असावा, असा कयासही पुरातत्त्व विभागाने लावला आहे. १९५०-५१ साली काजीच्या गढीवर झालेल्या उत्खननादरम्यान प्राचीन मानवी अधिवासाचे एकूण चार कालखंड पुरातत्त्व विभाग निश्चित करू शकले आहे.
असे होते ताम्रपाषाणयुग
गढीच्या उत्खननामध्ये पहिला कालखंड ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांचा अधिवास आढळून आला. ताम्रपाषाणयुगीनलोक हस्तीदंत, चुनखडी आणि टेराकोटा मातीचे कारागीर होते. हे लोक अधिकाधिक एका खोलीत मातीच्या चिखलापासून बनविलेल्या घरांमध्ये एकत्र वास्तव्य करीत होते. या युगातही लोक काळ्या व लाल गेरुच्या रंगाप्रमाणे मातीचे भांडे वापरत होते. हे लोक माती, तांब्यांची भांडी, आभूषणांसह मृत व्यक्तींना घरांमध्येच जमिनीच्या खाली पुरत असे. हे लोक लिखाणापासून अनभिज्ञ होते. भारतात या संस्कृतीचे लोक मुख्य करून दक्षिण-पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण, पूर्व भारतात जास्त प्रमाणात वास्तव्यास होते. ताम्रपाषाणयुगीन संस्कृती २००० ख्रिस्त पूर्व ते ७०० ख्रिस्त पूर्वपर्यंत अस्तित्वात होती. या ताम्रपाषाणयुगीन कालखंडातील जोर्वे संस्कृती इसवीसन ७०० पर्यंत अस्तित्वात राहू शकली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावालगत झालेल्या उत्खननामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाला ताम्रपाषाणयुगीन जोर्वे संस्कृ तीच्या लोकांचा अधिवास असल्याचे पुरावे मिळाले. पुरातत्त्व विभागाने गावाच्या नावावरून या ठिकाणी उत्खनन केले होते. त्या ठिकाणी रंगकाम केलेली मातीची भांडी, तांब्याची आभूषणे आढळून आली होती. या संस्कृतीचे लोकदेखील चिखलापासून बनविलेल्या आयताकृती घरांमध्ये राहत होते. मृत्यूनंतर पुन्हा जीवन यावर या संस्कृतीचा विश्वास होता, त्यामुळे हे लोक घरांमध्येच जमिनीखाली मृत व्यक्तींना पुरत होते
असे झाले उत्खनन...
जुने नाशिकमधील मातीची जुनी गढी जी सध्या काजीची गढी नावाने प्रसिद्ध आहे. या प्राचीन टेकडीवर १८८३ व १९०८ साली उत्खनन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या टेकडीच्या परिसरात १९५०-५१ सालात भारतीय पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेजच्या वतीने नियमित उत्खनन करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व विभागाने ही वास्तू ऐतिहासिक प्राचीन ठेवा म्हणून संरक्षित केली आहे. भारत सरकारच्या तत्कालीन पुरातत्त्व शिक्षण मंत्रालयाने १९४९-५० साली काजीची गढी प्राचीन स्मारके जतन कायद्यान्वये संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली. त्यानंतर डेक्कन कॉलेजच्या मदतीने पुरातत्त्व खात्याकडून याठिकाणी उत्खनन करण्यात आले. संरक्षित वास्तू म्हणून घोषित करण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने नियमित उत्खननाअगोदर झालेल्या उत्खननामध्ये आढळून आलेल्या विविध पुरातन वस्तू व अवशेषांवरून घेतला असावा. या उत्खननामध्ये पुरातत्त्व विभागाला चार कालखंडांमधील मानवी अधिवास निश्चित करता येईल, असे पुरावे आढळून आले आहे. .
ताम्रपाषाणयुग : संस्कृती
भारतात ताम्रपाषाणयुगामध्ये खालील संस्कृती अस्तित्वात होत्या.
१) अहाड- सुमारे १७०० ते १५०० इसवीसन पूर्व
२) कायथ- सुमारे २००० ते १८०० इसवीसन पूर्व
३) मालवा- १५०० ते १२०० इसवीसन पूर्व
४) सावलदा- २३०० ते २२०० इसवीसन पूर्व
५) जोर्वे- १४०० ते ७०० इसवीसन पूर्व
६) प्रभास- १८०० ते १२०० इसवीसन पूर्व
७) रंगपूर- १५०० ते १२०० इसवीसन पूर्व
* यापैकी महाराष्ट्रातील नेवासा, जोर्वे, चांडोली, सोनगाव, इनामगाव, पुणे, विदर्भ, नाशिक, दायमाबाद या भागांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या उत्खननामध्ये वरील संस्कृतींपैकी जोर्वे संस्कृतीच्या लोकांच्या अधिवासाचे पुरावे पुरातत्त्व विभागाला आढळून आले आहेत.