Kamala Mills fire: कारवाई थांबविण्यासाठी राजकीय दबाव, आयुक्तांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 10:49 PM2018-01-05T22:49:46+5:302018-01-05T22:50:05+5:30
बांधकामं पाडताना एका राजकीय नेत्याने मोठ्या आवाजात विचारले तुम्ही कशी काय कारवाई करता? असा गौप्यस्फोट करीत हा नेता कोण हे शोधण्याचे आव्हान विरोधी पक्षनेत्यांना देऊन सर्वांची बोलतीच बंद केली.
मुंबई- कमला मिल कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांना अप्रत्यक्ष अभय दिल्याचा आरोप आयुक्त अजोय मेहता यांच्यावरही होत आहे. मात्र येथील बांधकामं पाडताना एका राजकीय नेत्याने मोठ्या आवाजात विचारले तुम्ही कशी काय कारवाई करता? असा गौप्यस्फोट करीत हा नेता कोण हे शोधण्याचे आव्हान विरोधी पक्षनेत्यांना देऊन सर्वांची बोलतीच बंद केली.
कमला मिल आगीत 14 जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका महासभेत आज निवेदन केले. यावर स्पष्टीकरण देताना आयुक्तांनी ही माहिती सभागृहाला दिली. आगीच्या दुर्घटनेनंतर कमला मिलमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना एका राजकीय नेत्याने आपल्यावर दबाव आणल्याचे सभागृहात सांगितले.
मात्र मी एेकणार सगळ्यांचे पण काम करणार कायद्याप्रमाणेच हेच माझे तत्त्व आहे. म्हणूनच तिथे 17 बेकायदा बांधकामं मी पाडली आणि ही कारवाई अशीच सुरू राहणार, मी मागे हटणार नाही, असे सांगितले. मात्र त्या नेत्याचे नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. हा नेता कोण हे शोधण्याचे आव्हान त्यांनी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना केले.