कामती जि़प़ गटात दुरंगी लढत
By admin | Published: February 18, 2017 03:07 PM2017-02-18T15:07:30+5:302017-02-18T15:07:30+5:30
कामती जि़प़ गटात दुरंगी लढत
कामती जि़प़ गटात दुरंगी लढत
अशोक कांबळे - आॅनलाईन लोकमत मोहोळ
२००२ मध्ये शिवसेनेच्या ताब्यात गेलेल्यांचा अपवाद वगळता आजतागायत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा कामती जि़ प़ गट ओबीसी जनरलसाठी राखीव झाला आहे़ धनगर समाजाचे प्राबल्य असणाऱ्या या गटात भीमा परिवार विकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे यांचे खंदे समर्थक लांबोटीचे विद्यमान सरपंच तानाजी खताळ उभे आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक जिल्हा दूध संघाचे माजी संचालक सज्जनराव पाटील हे उभे आहेत़
राष्ट्रवादीच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या गटात फूट पडून राष्ट्रवादीच्या एका गटाला शह देण्यासाठी भीमा परिसर विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने खासदार धनंजय महाडिक, मनोहर डोंगरे व सेना व इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीतून उभे असलेले तानाजी खताळ व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून सज्जनराव पाटील अशी दुरंगी लढत या गटात लागली आहे़
धनगर समाजाचे प्राबल्य असणाऱ्या या जि़प़ गटात दोन्ही उमेदवार धनगर समाजाचे आहेत़ त्यामुळे आता या जि़प़ गटात राजन पाटील यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा गट ताब्यात ठेवण्यात यशस्वी होणार का, राष्ट्रवादीच्याच एका गटाच्या ताकदीबरोबर धनंजय महाडिक व शिवसेनेचा पाठिंबा असणाऱ्या महाआघाडीच्या जोरावर राष्ट्रवादीकडून गड हिसकावून घेण्यात महाआघाडी यशस्वी होणार का, अशा या थेट दुरंगी लढतीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
ऐन निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादीत फूट पडली़ राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी भीमा परिवार विकास आघाडीसोबत जाऊन तालुक्यात राजन पाटील यांच्या राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे़ या फुटीतच तानाजी खताळ यांनी मनोहर डोंगरे यांचे नेतृत्व स्वीकारत आघाडीतून उमेदवारी दाखल केली आहे़
तर दुसरीकडे राष्ट्रवादीची एकहाती धुरा सांभाळत राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सर्व आघाड्यांना आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहे़त. अशा राष्ट्रवादीतून दूध संघाचे माजी संचालक सज्जनराव पाटील यांनीही उमेदवारी घेऊन आव्हान स्वीकारले आहे़
------------------------
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
कामती जि़ प़ गट हा पूर्वीपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो़ २००२ मध्ये मात्र या गटावर शिवसेनेने विजय मिळविला होता़ नंतर पुन्हा राष्ट्रवादीने हा गड ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते़ परंतु आता राष्ट्रवादीचेच दोन प्रबळ गट एकमेकांविरोधात गेल्याने एका बाजूला निष्ठावंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर दुसरीकडे राष्ट्रवादी भीमा परिवार विकास आघाडी, सेना, भाजपा, रासप व इतर मित्रपक्ष या गटात आघाडीसोबत आहेत़ त्यामुळे या गटात लागलेल्या या दुरंगी सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़