कामगाराला हाव नडली

By admin | Published: August 12, 2015 03:23 AM2015-08-12T03:23:45+5:302015-08-12T03:23:45+5:30

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खासगी सफाई कामगाराच्या हाती दोन किलो सोने लागले. ते त्याने कस्टमकडे सोपविण्यास हवे होते, पण त्याला हाव सुटली.

Kamgarara haav cast | कामगाराला हाव नडली

कामगाराला हाव नडली

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खासगी सफाई कामगाराच्या हाती दोन किलो सोने लागले. ते त्याने कस्टमकडे सोपविण्यास हवे होते, पण त्याला हाव सुटली. त्याने एक किलो सोने स्वत:साठी ठेवून घेतले आणि उरलेले एक किलो सोने प्रामाणिकपणाचा आव आणून कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटला दिले आणि ते बेवारस अवस्थेत सापडल्याची कहाणीही रचली. इतक्यात ज्याने सोने दिले होते, तो आला आणि त्याने भांडण सुरू केले. दोघांमधला संवाद ऐकून एआययूने दोघांना गजाआड केले आणि सोन्याची संभाव्य तस्करीही रोखली.
मंगळवारी इरफान मोहम्मद शेख हा तरूण दुबई व्हाया कुवेत असा प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरला. त्याने तब्बल २,०९९ ग्रॅम सोने आणले होते. मात्र विमानतळावरील बंदोबस्त व प्रवाशांची झाडाझडती पाहून तो घाबरला. भीतीपोटी त्याने अरायव्हल पॅसेजमधील शौचालय गाठले. तेथे विक्की प्रजापती साफसफाई करत होता. इरफानने आपल्याकडील दोन किलो सोने विक्कीकडे दिले. हे सोने विमानतळाबाहेर सुरक्षितपणे काढून दिल्यास ३० हजार रूपये देईन, असे आमीषही दाखवले. विक्की लगेच तयार झाला. युसूफ शौचालयातून बाहेर पडताच विक्कीला हाव सुटली. त्याने एक किलो सोने शौचालयातील कचरापेटीत दडवून ठेवले. शौचालय बंद करून उर्वरित सोने घेऊन त्याने तत्काळ एआययू अधिकाऱ्यांना गाठले. हे सोने मला शौचालयात बेवारस आढळल्याची थापही मारली.
दुसरीकडे बराच वेळ झाला तरी विक्की येत नाही, हे पाहून इरफानने शोध सुरू केला. साध्या वेशातील एआययू अधिकाऱ्यांसोबत प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त असलेल्या विक्कीला इरफानने गाठले. त्याने सोन्याबाबत विचारपूस सुरू केली. दोघांमध्ये वादही झाला. एआययू अधिकाऱ्यांसमोरच वाद झाल्याने चोरी पकडली गेली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता विक्कीचा तस्करीतील सहभाग समोर आला.(प्रतिनिधी)

विमानतळावरील शौचालयांच्या स्वच्छतेचे कंत्राट ए टू झेड कंपनीकडे आहे. विक्की याच कंपनीचा कर्मचारी आहे. पूर्वी याच कंपनीचे आणखी तीन कर्मचारी सोने तस्करीत गजाआड झालेले आहेत. विक्कीच्या अटकेनंतर एआययूने कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना कर्मचारी-कामगार नेमताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती एआययूचे सहआयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

चौथा कामगार अटकेत
सोने कस्टमने पकडले असे सांगून विक्की इरफानला फसवणार होता. मात्र योगायोगाने सोन्यासह दोघेही आमच्या तावडीत सापडले, एआययूच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. इरफानने चौकशीदरम्यान हे सोने तस्करीतले नसून स्वत:साठी विकत घेतल्याचा दावा केला. मात्र इरफानची एकूण अवस्था पाहून त्याची दोन किलो सोने विकत घेण्याची ऐपत असावी, असे एआययूला जाणवले नाही. इरफान हा सोन्याचा कॅरिअर असावा, असाही संशय एआययूला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
इरफानने आपल्याकडील दोन किलो सोने विक्कीकडे दिले. हे सोने विमानतळाबाहेर सुरक्षितपणे काढून दिल्यास ३० हजार रूपये देईन, असे आमीषही दाखवले.

Web Title: Kamgarara haav cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.