खंडित वीजपुरवठ्याने कामशेतवासीय हैराण

By Admin | Published: May 19, 2016 02:27 AM2016-05-19T02:27:13+5:302016-05-19T02:27:13+5:30

मावळात अनेक ठिकाणी खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून, कामशेत शहरातील ठरावीक काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

Kamshatwari Haraan, with the help of breaking power | खंडित वीजपुरवठ्याने कामशेतवासीय हैराण

खंडित वीजपुरवठ्याने कामशेतवासीय हैराण

googlenewsNext


कामशेत : मावळात अनेक ठिकाणी खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून, कामशेत शहरातील ठरावीक काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा कमी दाबाचा असल्याने व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील देवराम कॉलनी, संभाजी चौक, शिवाजी चौक ते मंगल कार्यालयापर्यंतच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. पुरवठा कमी दाबाचा होत असल्याच्या तक्रारी नागरिक महावितरण कार्यालयात करत आहेत.
या भागांमध्ये पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग शॉप, हॉस्पिटल, हॉटेल, लाँड्री व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकलची दुकाने, प्रिंटिंग प्रेस आदी विजेची आवश्यकता
असलेले व्यवसाय आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, तसेच कमी दाब यांमुळे अनेक व्यावसायिक यंत्रे चालत नाहीत, तसेच त्यांच्यात बिघाड होतो. परिणामी, त्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय यंत्रांच्या सततच्या बिघाडाने डोकेदुखी वाढली आहे.
महावितरण कार्यालयात तक्रार द्यायला गेल्यास अधिकारी उपस्थित नसतात. वायरमन व कंत्राटी कामगार चिरीमिरी दिल्याशिवाय काम करत नाही, असे तक्रारदार सांगतात. प्रशासनाचा वचक नसल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होते. भरमसाठ बिल भरूनही सेवा दिली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
रविवारी सांयकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित झाला, तो सकाळीच सुरू झाला. याविषयी अधिकाऱ्याला विचारले असता, रात्रपाळीला कामगार नसतात, असे उत्तर मिळाले. संभाजी चौकातील एका हॉस्पिटलमध्ये रविवारी प्रसूतीची रुग्ण असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने, तसेच हॉस्पिटलचे जनरेटर अचानक नादुरुस्त झाल्याने हॉस्पिटल व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागली.
महावितरणच्या गलथान कारभाराने नागरिक हैराण असून, रात्री वीज खंडित झाल्यास ती परत येणे रामभरोसे आहे. विजेअभावी कुलर, पंखे आदी उपकरणे बंद होत असल्याने उन्हाळ्यातील असह्य उकाडा नागरिकांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
>कित्येक महिने तक्रार देऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही. विजेच्या कमी दाबामुळे आमच्या अनेक वैद्यकीय मशिन काम करत नाहीत. महावितरण कार्यालयात अधिकारी नसतात. सर्वच कारभार रामभरोसे चालू आहे, असे एका खासगी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.
देवराम कॉलनीतील रोहित्राची वीजपुरवठा क्षमता कमी असून, त्यावर जास्त वीज कनेक्शनचा भार असल्याने वारंवार एक फेज जातो. नवीन रोहित्र मंजूर झाले असून, ते बसवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ही अडचण होत आहे, असे महावितरण अधिकारी राणे यांनी सांगितले.

Web Title: Kamshatwari Haraan, with the help of breaking power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.