कामठीत भोयर यांची माघार
By admin | Published: October 1, 2014 12:48 AM2014-10-01T00:48:05+5:302014-10-01T00:48:05+5:30
कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी मंगळवारी अर्ज
काँग्रेसला समर्थन
नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी मंगळवारी अर्ज परत घेतला असून काँग्रेसचे उमेदवार माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना पाठिंबा दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे भोयर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
सुरेश भोयर यांनी कामठी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला होता. मंगळवारी सकाळी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. तीत अनंतराव घारड, राजेंद्र मुळक, सुरेश भोयर, देवराव रडके आदी उपस्थित होते. या वेळी वासनिक यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा घडवून आणली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भोयर यांना फोन करून काँग्रेसच्या हितासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. नेत्यांच्या विनंतीचा मान ठेवत भोयर यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला व मुळक यांना समर्थन जाहीर केले. आपल्या या निर्णयामुळे कामठी मतदारसंघाला नवी दिशा मिळेल,असा विश्वासही भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.
अर्ज परत घेताना भोयर यांच्यासोबत राजेंद्र मुळक, माजी आ. देवराव रडके, जिल्हा परिषद सदस्य बबिता साठवणे, मौदा नगर पंचायत समितीचे अध्यक्ष उमेश गभणे, राजेश निनावे, तुळशीराम काळमेघ, हुकूमचंद आमधरे, प्रसन्ना तिडके, प्रभाकर मोहोड, मुरलीधर भर्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)