कांदिवली संघाची विजयी सलामी
By admin | Published: May 11, 2017 02:39 AM2017-05-11T02:39:41+5:302017-05-11T02:39:41+5:30
कांदिवली केंद्राने प्रतिष्ठेच्या २७व्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना कलिना केंद्राचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली केंद्राने प्रतिष्ठेच्या २७व्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना कलिना केंद्राचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. अन्य सामन्यात शिवाजी पार्क संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बाजी मारली.
कांदिवली संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना, ‘ब’ गटातून शानदार विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कलिना संघाचा केवळ ८९ धावांमध्ये खुर्दा उडवून कांदिवलीने अर्धा सामना जिंकला. यानंतर, पहिल्या डावात कांदिवलीने १२४ धावांची मजल मारत ३५ धावांची निर्णायक आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा कलिनाची घसरगुंडी उडाली. आर. विजय (३/४८) आणि निशांत कदम (३/१९) यांच्या भेदक माऱ्यापुढे कलिनाचा डाव १४० धावांत संपुष्टात आला. या वेळी १०५ धावांचे लक्ष्य मिळालेल्या कांदिवलीने केवळ एक फलंदाज गमावून दणदणीत विजय मिळवला. शुभम छागने झळकावलेल्या आक्रमक ५९ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १ बाद १०९ धावा करून कांदिवलीने सहज बाजी मारली.
दुसरीकडे झालेल्या सामन्यात मनल कावळेने जबरदस्त शतक झळकावताना शिवाजी पार्क संघाचा विजय साकारला. घाटकोपर केंद्राविरुद्ध झालेल्या लढतीच्या पहिल्या डावात शिवाजी पार्कने
९३ धावांच्या आघाडीच्या जोरावर बाजी मारली, तसेच या वेळी मनलने यंदाच्या स्पर्धेत पहिले शतक झळकावण्याचा मानही मिळवला. घाटकोपरचा पहिला डाव १५९
धावांत गुंडाळल्यानंतर शिवाजी पार्क संघाने आपला डाव ६ बाद २५२ धावांवर घोषित करून ९३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. मनलने १४३ धावांची धमाकेदार खेळी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
यानंतर, घाटकोपरने दुसऱ्या डावात चांगचा खेळ केला. फैझ खानच्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १५७ धावांवर डाव घोषित केला.
आयुष्य झिमरेने भेदक मारा
करताना २१ धावांत ६ बळी घेत घाटकोपरचे कंबरडे मोडले.
मात्र, पहिल्या डावातील
आघाडी निर्णायक ठरवताना
शिवाजी पार्कने अपेक्षित बाजी मारत आगेकूच केली.