कांदिवलीत अग्नितांडव, दोन हजार संसार उद्ध्वस्त
By admin | Published: December 8, 2015 02:37 AM2015-12-08T02:37:32+5:302015-12-08T02:37:32+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सोमवारी दुपारी दोन हजारांहून अधिक संसार तासा-दोन तासांत उद्ध्वस्त झाले.
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सोमवारी दुपारी दोन हजारांहून अधिक संसार तासा-दोन तासांत उद्ध्वस्त झाले. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झाले आहेत.
दामूनगर परिसरात राहणारी वस्ती ही हातावर पोट भरणारी आहे. मोलमजुरी करणारा हा कामगारवर्ग कामानिमित्त बाहेर पडला होता. शिवाय विद्यार्थीवर्गही शाळेत गेला होता. येथे लागलेली आग डोंगरमाथ्याहून खाली पसरल्याने स्थानिकांना सुरक्षितरीत्या आपला जीव वाचविता आला. त्यामुळे जीवित हानी टळली असली तरी राहती झोपडीच गेल्याने दोन हजारांहून अधिक कुटुंबांचे हाल सुरू झाले आहेत.
या आगीत तब्बल ५० सिलिंडर्सचे स्फोट झाल्याचे बोलले जाते. त्याचमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर्स या झोपडपट्टीत आले कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहेत. अखेर दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. (प्रतिनिधी)
आग लागली की...?
पश्चिम उपनगरात झोपड्यांचे इमले उभे राहत आहेत. या झोपड्या अधिकृत की अनधिकृत हे पाहण्याचे काम महापालिका प्रशासनाचे. मात्र महापालिकेने याकडे कानाडोळा केला.
परिणामी तिवरांची कत्तल करून झोपड्यांचे इमले उभे राहत आहेत. येथील झोपड्यांवर भू-माफियांचाही डोळा असून, दामूनगर झोपडपट्टीलगत समतानगर नावाची मोठी वस्ती आहे. सोमवारी लागलेल्या आगीनंतर समतानगरच्या जमिनीवर तर कुणाचा डोळा नाही ना, अशा शकांनी डोके वर काढले आहे.
मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आगीने वेढले.
या आगीची दाहकता
एवढी होती की, यात
दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या.
आग विझवण्यासाठी घटनास्थळी १६ फायर इंजिन, १२ पाण्याचे टँकर्स, १०८ क्रमांकाच्या ११ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या २ रुग्णवाहिका तातडीने पोहोचल्या