कांदिवलीत महिला कलाकाराची हत्या करुन मृतदेह गटारात फेकला
By Admin | Published: December 13, 2015 04:57 PM2015-12-13T16:57:33+5:302015-12-13T16:57:33+5:30
कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरीश भामभानी यांचे ते मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरीश भामभानी यांचे ते मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये भरुन हे मृतदेह गटारात फेकण्यात आले होते. दोघांचीही गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
उपाध्याय यांचे हात बांधण्यात आले होते. दोन्ही मृतदेहांवर अंर्तवस्त्र वगळता एकही कपडा नव्हता तसेच मृतदेह फार खराब झालेल्या अवस्थेत नव्हते. दोन दिवसांपूर्वी हत्या झाली असण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. हेमा उपाध्याय या कलाकार होत्या. त्यांना गुजरात ललित कला अकादमी आणि राष्ट्रीय ललिक कला अकादमीकडून पुरस्कार मिळाला होता.
हेमा यांच्या घरी काम करणा-या हेमंत मंडल याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ६५ वर्षीय भामभानी यांच्या कुटुंबानेही ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.