कान्हा : व्याघ्र संरक्षणासाठी जगाचे आशास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:06 AM2018-07-01T04:06:17+5:302018-07-01T04:06:21+5:30
सध्या जगभर वाघांच्या संरक्षणासाठी विशेष मोहिमा आखल्या जात आहेत. खरे म्हणजे, वाघांच्या अस्तित्वाचा मुद्दा निर्माण झाला आहे तो अमेरिकेमुळे.
- राहुल रनाळकर
सध्या जगभर वाघांच्या संरक्षणासाठी विशेष मोहिमा आखल्या जात आहेत. खरे म्हणजे, वाघांच्या अस्तित्वाचा मुद्दा निर्माण झाला आहे तो अमेरिकेमुळे. जगात सध्या ३,२०० वाघ असल्याचे डब्ल्यूडब्लूएफचा अहवाल सांगतो, पण अमेरिकेतील प्राणिसंग्रहालये किंवा एकूणच बंदिवासात असलेल्या वाघांची संख्या ५ ते ७ हजार असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेत बंदिवासात असलेल्या वाघांच्या संदर्भात कोणतेही ठोस कायदे नसल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे.
भारताच्या संदर्भात विचार करता, २०१० मध्ये देशात १,७०६ वाघ होते. २०१४च्या व्याघ्रगणनेनुसार ही संख्या वाढून २,२२६ झाली. सध्या ५० अभयारण्यांमध्ये व्याघ्रगणना सुरू असून, वाढीचा हा ट्रेंड सुरू राहील, अशी आशा व्याघ्र अभ्यासकांना आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला नेमकी आकडेवारी समोर येणार आहे. देशातील एकूण वाघांच्या संख्येपैकी १३१ वाघ एकट्या कान्हामध्ये आहेत. त्यामुळे देशासह संपूर्ण जगातील व्याघ्र अभ्यासकांचे कान्हा हे मुक्कामाचे ठिकाण आहे.
कान्हाचा कोअर एरिया तब्बल ९४० किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. कान्हाला १९५५ मध्ये राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा देण्यात आला, तर १९७३-७४ मध्ये प्रोजेक्ट टायगरची घोषणा करण्यात आली. कान्हा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना अतिशय पद्धतशीर फिरविले जाते. त्याची अचूक व्यवस्था मध्य प्रदेश वनखात्याच्या माध्यमातून केली जाते.
कान्हाची वाघाशिवायची दुसरी ओळख म्हणजे, जगभर नामशेष होत चाललेले बाराशिंगा. जगात सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त कान्हामध्ये बाराशिंगा आहेत. मध्य प्रदेशचा राज्यप्राणीही बाराशिंगा आहे. बाराशिंगाची पैदास केंद्रे कान्हामध्ये निर्माण करण्यात आली आहेत. भारतातील व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात झाली, तेव्हा पहिल्यांदा मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाचा सरकारने विचार केला. कान्हा राष्ट्रीय उद्यानात पहिला व्याघ्र प्रकल्प राबविला गेला. विशेष म्हणजे, व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी सर्वाधिक यशस्वी ठरला. सुप्रसिद्ध लेखक आणि नोबेल पारितोषिक विजेते रुडयार्ड किपलिंग यांची सुप्रसिद्ध कादंबरी, अर्थातच ‘जंगल बुक’ ही साहित्यकृती याच उद्यानावरून त्यांना सुचली. ही आपल्या देशासाठीही विशेष बाब मानली जाते.
या उद्यानाची स्थापना १ जून, १९५५ मध्ये करण्यात आली. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मंडला आणि बालाघाट या मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. उद्यानाचे गाभाक्षेत्र व परिसर क्षेत्र एकूण मिळून १००९ चौ. किलोमीटर एवढे विशाल आहे. व्याघ्र प्रकल्प असल्याने येथील पर्यटकांचे मोठे आकर्षण, अर्थातच पिवळा पट्टेरी वाघ हेच आहे, तसेच अन्य अभयारण्यांपेक्षा या ठिकाणी वाघांची संख्या सर्वाधिक असल्याने, येथे हमखास वाघ दिसतोच. साधारणपणे दोन पूर्ण दिवस थांबून चार राइड केल्यास किमान एका राइडमध्ये तरी वाघ दिसतोच, असा पर्यटकांचा अनुभव आहे. २००६ सालच्या वाघांच्या गणनेनुसार येथे १३१ वाघ होते. त्यानंतरही कठोर कायद्यांमुळे व सुरक्षेमुळे आज ही संख्या सातत्याने वाढती आहे.
जंगलातील अन्य प्राणिसंपदा
वाघांच्या व्यतिरिक्त या जंगलात अस्वल, बाराशिंगे, हरणे, रानकुत्री, रानकोंबड्या, बिबट्या, चितळ, सांबर, गवे, रानडुक्कर, कोल्हे, खोकड, माकडे, पाणमांजरी, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, तरस, खवलेमांजर, साळिंदर, नीलगायी, काळविट अशी मुबलक प्राणिसंपदा मोठ्या प्रमाणावर आहे, तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कोब्रा, नाग, मण्यार, घोणस, मगरी, घोरपड हे प्राणी आहेत. सतत दिसणाºया प्राण्यांमध्ये गवे, अस्वले, रानडुक्कर, कोल्हे यांची संख्या जास्त आहे. भारतात दुर्मीळ असलेला लांडगाही येथे आढळतो. येथील चितळांची संख्या तर २० हजारांहूनही अधिक आहे, तर गव्यांची संख्या ६ हजारांहून अधिक आहे. भारतीय रानकुत्र्यांची संख्याही येथे सर्वाधिक आहे.
कान्हाचे जंगल हे मुख्यत्वे पानगळी प्रकारचे आहे. येथे साल वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कान्हा उद्यान व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केल्यानंतर, आतील सर्व गावे इतरत्र हलविण्यात आली व
संपूर्ण जंगल निर्मनुष्य करण्यात आले. ज्या
भागात मानवी वस्ती व शेती होती, त्या ठिकाणी मोठमोठ्या कुरणांची निर्मिती झाली. या कुरणांमध्ये गवताचे खाद्य हरणांसह अन्य शाकाहारी प्राण्यांना मिळाले. त्यामुळे त्यांची पैदास चांगली व मोठ्या प्रमाणावर झाली. याच ठिकाणी एक अशीही वनस्पती उगवते, ती बाराशिग्यांनाही खाण्यास खूप उपयोगी पडते. प्रोजेक्ट टायगर नावाने प्रसिद्ध असलेला प्रकल्प भारत सरकारतर्फे चालविला जातो. याचा मुख्य हेतू म्हणजे, भारतीय वाघांचे संरक्षण करणे. या अंतर्गतच त्यांच्या वस्तिस्थानांचे संरक्षण व संख्येत वाढ करणेही अपेक्षित आहे. जंगलांवर मानवी अतिक्रमण वाढत गेल्याने, वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने, पाळीव प्राण्यांवरील वाघांचे हल्ले वाढले. वाघ पाळीव प्राणी खातात, म्हणून विषप्रयोग करत त्यांना मारण्यापर्यंत माणसाची मजल गेली. वाघांची ही चिंताजनक स्थिती पाहून अनेक वन्यजीवप्रेमींनी आवाज उठविला. त्याला कायद्यानेही साथदिली आणि १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आला.
कान्हाची कौतुकास्पद गोष्ट अशी की, अभयारण्यातील चोख शिस्त आणि सुयोग्य व्यवस्थापन. कोणत्याही प्रकारच्या बेशिस्तीला येथे थारा नाही. अभयारण्यातील एकंदर वातावरण पाहता, अशी बेशिस्त करावी, हे कोणालाही वाटणारच नाही. पर्यटकांच्या खाण्या-पिण्याच्या व राहण्याच्या सोयीसाठी एम. पी. टुरिझमच्या गेस्ट हाउससह अनेक खासगी हॉटेल्स व रिसॉटर््स दिमतीला आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महिंद्रा हॉलीडेजच्या कान्हा लगतच्या रिसॉर्टला भेट दिली. या भेटीत निसर्गाच्या सान्निध्याचा संपूर्ण अनुभव मिळतो. चहूबाजूची जंगलाची संस्कृती महिंद्राने जपली आहे. स्थानिक संस्कृतीचाही अनुभव येथे घेता येतो. परिसरातील लोक-संस्कृती आणि जंगल हे अभिन्न असल्याचेच येथे जाणवते. जंगलात फिरण्यासाठी पर्यटक ओपन जीप गाड्या वापरतात. जवळपास प्रत्येक हॉटेलच्या स्वत:च्या गाड्या आहेत.
वाघ आणि अन्य प्राणी पाहण्यासाठी पहाटे लवकर निघणे केव्हाही सोईस्कर. जेवढे लवकर जंगलात शिरू तितके प्राणी जास्त पाहायला मिळतात. उन्हाळ्यापेक्षाही हिवाळ्याच्या दिवसात येथे जाणे उत्तम, तसेच प्रत्येक जीपमध्ये चार जण बसू शकतात. सोबत एक ड्राइव्हर आणि एक मार्गदर्शक दिमतीला असतो. कारण तो जंगलाचा नियम आहे. हे गाइड बहुतांशी येथील जंगलाच्या आसपासच राहणारे बैगा जातीचे आदिवासी आहेत. त्यामुळे जंगल, प्राणी त्यांचे कॉल्स आणि त्यांची नेमकी जागा याची त्यांना बारकाईने माहिती असते. नियमानुसार, पर्यटकांना जंगलात शिरण्याआधी आपली सर्व माहिती द्यावी लागते. येथील आणखी एक आकर्षण म्हणजे हत्ती सफारी. हत्तीच्या पाठीवर बसून वाघाच्या मागावर शिरणे आणि घनदाट जंगलात जाऊन वाघ पाहणे. हा थरार अगदी अनुभवण्यासारखाच. त्यातली मजाच काही वेगळी आहे. कान्हामध्ये रात्र सफारीचाही अनुभव आवर्जून घ्यावा असा आहे. रात्र सफारीसाठी केवळ तीन जिप्सींना परवानगी दिली जाते. किर्रर्र अंधारात प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकणे हाही एक थरारक अनुभव ठरतो.
कसे जावे?
रेल्वेने जबलपूर गाठावे. तेथून बस किंवा खासगी वाहनाने मंडला गावी जावे. तेथून कान्हा अभयारण्य जवळ आहे. (प्रवास जबलपूरहून अंदाजे २ तास)
रेल्वेने नागपूर गाठावे तेथून बस किंवा खासगी वाहनाने थेट कान्हा मध्ये जाता येते. (प्रवास नागपूरहून अंदाजे ५.३० तास)
नजीकची प्रसिद्ध ठिकाणे - भेडाघाट (नर्मदेची घळई), द्वारालोक मंदिर, बांधवगड अभयारण्य.
पर्यटकांसाठी महत्त्वाचे
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ - जानेवारी ते जून २० पर्यंत.
वेळ - सूर्योदयापासून ते ११ वाजेपर्यंत आणि दुपारी ४.३० ते सूर्यास्तापर्यंत.
विशेष - उद्यानात पायी फिरण्यास सक्त मनाई आहे.
(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत)